Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआता घरबसल्या मिळणार मालवाहतुकीचा परवाना

आता घरबसल्या मिळणार मालवाहतुकीचा परवाना

नाशिक | प्रतिनिधी
संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहतूकदारांना परवाना घेणे अनिवार्य आहे. या परवान्यासाठी जिल्हाभरातील वाहतूकदारांना आता पेठरोडवरील आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. या विभागाने ऑनलाइन प्रणाली विकसित केली असून त्याद्वारे वाहनधारकांना घरबसल्या हा परवाना मिळविता येणार आहे.
लॉकडाऊनदरम्यान जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वाहतूकदारांना त्यांची वाहने रस्त्यावर उतरविणे अनिवार्य ठरणार आहे. या वाहनांव्यतिरिक्त अन्य कोणतेही वाहन रस्त्यावर उतरू नये याकरिता जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष परवाना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
हा परवाना मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे आरटीओने घरबसल्याच परवाना देण्याची यंत्रणा विकसित केली आहे. www.transport.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील Apply for e-passes for goods vehicles या लिंकवर क्लिक करून त्यामध्ये आवश्यक माहिती भरून अर्ज करता येणार आहे.
कार्यालयाद्वारे परवाना जारी केल्यानंतर अर्जदाराच्या मोबाइलवर परवाना जारी केल्याचा संदेश प्राप्त होईल. या संदेशातील लिंकद्वारे अर्जदार परवान्याची प्रिंट काढू शकेल. त्यामुळे अर्ज केल्यानंतर कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्याची आवश्यकता राहणार नाही. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहतूकदारानी या प्रणालीद्वारे अर्ज सादर करुन या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे.
१७०० हून अधिक वाहनांना परवानगी
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूसोबतच फळे, भाजीपाला व इतर अत्यावश्यक वाहतूक करणाऱ्या १ हजार ७५१वाहनांना वाहतुकीसाठी नाशिक व मालेगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत परवानगी देण्यात आली आहे. दिवसागणिक परवानाधारकांची संख्या वाढतेच आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या