Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यावाहतूक सुरक्षेचा अहवाल मनपाकडे सादर

वाहतूक सुरक्षेचा अहवाल मनपाकडे सादर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिर्ची चौकात खासगी बसच्या भीषण अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नाशिक शहर अपघातमुक्त करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील अपघातांचे ब्लॅक स्पॉट आणि अपघातप्रवण क्षेत्रासंदर्भात माहिती घेऊन उपाययोजनांबाबत मनपा आयुक्तांनी रेझिलियंट इंडिया कंपनीला सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार कंपनीने 40 दिवस अभ्यास करून सुमारे 600 पानांचा अहवाल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सादर केला.

- Advertisement -

अहवाल मोठा असल्यामुळे तसेच त्यात फोटोसह व्हिडिओ चित्रिकरण व इतर माहिती असल्यामुळे ईमेलद्वारे सादर करण्यात आले असल्याची माहिती एनजीओचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव चौबे तसेच रिस्क मॅनेजमेंट एक्सपर्ट प्रियंका लाखोटे यांनी दिली. चाळीस दिवस चाललेल्या या सर्वेक्षणात सुमारे 200 विविध ठिकाणच्या लोकांशी संवाद साधला गेला. तर शहर व उपनगरीय परिसरात तब्बल 26 ब्लॅक स्पॉट आढळले असून वर्षाला जवळपास 65 टक्के दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू होत आहे.

अपघात टाळण्यासाठी ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणेसह स्पीड मीटर बसवणे व वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ई-चलन यंत्रणा अमलात आणणे आदी पर्याय सुचवण्यात आले आहेत. अत्यंत वर्दळीचा द्वारका चौक, मुंबईनाका सर्कल, गडकरी चौक, नांदूरनाका, सिध्दिविनायक चौक, मिर्ची चौक, नाशिकरोड येथील दत्त मंदिर सिग्नल, उपनगर सिग्नल, फेम मल्टिपेल्स सिग्नल यांसह 26 ब्लॅक स्पॉटचा बारकाईने अभ्यास करुन अपघात कारणाची सखोल मिमांसा अहवालात केली आहे. येथील अपघात टाळण्यासाठी पर्याय सुचवले आहेत.

त्यात प्रामुख्याने जुने गतिरोधक काढून त्याऐवजी सीबीएस येथील स्मार्ट रोडसारखे स्पीड ब्रेकर बसवावे, जुन्या गतिरोधकावर वाहनांचा स्पीड कंट्रोल होत नाही व त्यामुळे बहुतांश अपघात घडतात हे प्रमुख कारण समोर आले आहे. शिवाय दृश्यमानता वाढविण्यासाठी हायमास्ट लावणे, दुभाजक बसवणे, मार्गदर्शक सूचना फलक, स्पीड तपासण्यासाठी सीसीटिव्ही लावणे, पादचार्‍यांसाठी फुटपाथची व्यवस्था, चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवणे आदी उपाय सुचविण्यात आले आहेत.

दीड किलोमीटरचा उड्डाणपूल

मिर्ची चौकातील ब्लॅक स्पॉटवर अपघात टाळण्यासाठी उड्डाणपूल बांधावा, असा पर्याय देण्यात आला आहे. त्यात मिरची चौक ते नांदूरनाका असा दीड किलोमीटरचा उड्डाणपूल बांधावा अथवा नांदूरनाका, सिद्धिविनायक चौक व मिर्ची चौक या तीन ठिकाणी छोटे उड्डाणपूल बांधावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच द्वारकापासून नाशिकरोडपर्यंत उड्डाणपुलाची गरज असल्याचे सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. शहरात जेथे महापालिकेचे रस्ते, राज्य व राष्ट्रीय महामार्ग एकत्र येतात अशा स्पॉटवर अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. उदाहरण म्हणजे द्वारका सर्कल. ही समस्या सोडवण्यासाठी शहराच्या बाहेर पडणार्‍या अवजड वाहतुकीसाठी रिंगरोडद्वारे हा पर्याय सुचवण्यात आला आहे.

असे होतात अपघात

हिट ऑफ साईट व हिट रनचे अपघात सर्वाधिक

25 टक्के अपघात मोबाईलमुळे

45 टक्के अपघात हेल्मेट परिधान न केल्याने

रेझिलियंट इंडिया या संस्थेने ब्लॅक स्पॉट प्रकरणी सहाशे पानांचा अहवाल दिला आहे. त्यातील उपाययोजना येत्या महिनाभरात अमलात आणल्या जातील.

शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका

- Advertisment -

ताज्या बातम्या