Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबिटको चौकातील वाहतूक समस्या गंभीर

बिटको चौकातील वाहतूक समस्या गंभीर

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

येथील बिटको चौकातील वाहतूक प्रश्न गंभीर झाला आहे. पोलिस असूनही वाहने सिग्नल तोडत असल्याने अपघात होत आहेत. बेशिस्त वाहतूकही त्याला जबाबदार आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा जटील बनला आहे.

- Advertisement -

बिटको चौकात वाहतूक शाखेची पोलिस चौकी आहे. दिवाळीत वाहतूककोंडी होते तेव्हा पोलिसांना आवरणे कठीण जाते. पोलिस असले तरी वाहनचालकांना सिग्नल तोडण्याची घाई असते. त्यामुळे एखादा गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. चौकापासून शंभर मीटरवर नाशिकरोड पोलिस ठाणे आहे. तेथेही पोलिस असतात. बेशिस्त वाहतूक नियंत्रणासाठी नियमित पोलिस नसतात. चौकाच्या चारी मार्गांवर बेकायदेशीरपणे वाहने पार्क केली जातात.

पार्किंगला बंदी हवी

पोलिसांनी बिटको चौकाच्या चारी बाजूला नो पार्किंग झोन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. बिटको चौकात हॉटेल पवनसमोर एसटी आणि खासगी प्रवाशी कंपन्याच्या बसचा थांबा आहे. ही वाहने रस्त्यातच उभी राहत असल्याने बिटको सिग्नल सुटल्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. बिटको चौकात वीर सावरकर उड्डाण पुल झाला आहे. अनेक वाहने वर निघून जात असली तरी त्यापेक्षा जास्त वाहने पुलाखालून म्हणजे बिटको चौकातून सिन्नर आणि व्दारकेच्या दिशेने जातात. बिटको चौकातून सिन्नरफाट्याकडे जाताना डाव्या हाताला पवन हॉटेल आहे. तेथून ते पोलिस ठाण्यापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहने मोठ्या संख्येने पार्क केलेली असतात. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे.

भाजीबाजार समस्या

नाशिकरोडच्या वीर सावरकर उड्डाण पुलाखाली अऩेक वर्षांपासून भाजीबाजार भरतो. बाजाराच्या दोन्ही बाजूला लोखंडी संरक्षक जाळ्या आहेत. त्या अऩेक ठिकाणी तोडून रस्त्यावर येण्यासाठी मार्ग करण्यात आला आहे. भाजी घेतल्यानंतर नागरिक अचानक रस्त्यावर येतात. त्यामुळेही अपघाताची भिती आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी पोलिसांनी बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या