Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकमालेगावातील वाहतूक बेटे

मालेगावातील वाहतूक बेटे

मालेगाव |संजय पाठक

रस्त्यावरील आणि विशेष करून चौकातील वाहतूक सुरळीत आणि विनाअपघात चालावी यासाठी चौकांमध्ये वाहतूक बेट (Traffic Island)) तयार केलेले असतात. प्रत्येक छोट्या- मोठ्या शहरांमध्ये अशी वाहतूक बेटे निर्माण करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी या वाहतूक बेटांचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. अशा सौंदर्यीकरण केलेल्या वाहतूक बेटांकडे पाहतांना पादचारी आणि वाहनाने जाणार्‍यांना देखील काहीतरी सुंदर गोष्ट पाहिल्याचे समाधान लाभते.

- Advertisement -

सौंदर्यीकरण केलेल्या अशा वाहतूक बेटांमुळे शहराचे वातावरण देखील प्रसन्न बनते. शिवाय नागरिकांमध्ये सौंदर्यदृष्टी वाढीस लागते आणि शहराच्या सौंदर्यातही भर पडते. वाहतूक बेटांमुळे वाहतूक सुरक्षित होण्याबरोबरच ती विनाअडथळा चालूही राहते.

नवीन वाहतूक बेटे

मालेगावात अनेक ठिकाणी, गेल्या काही वर्षांत, अशी वाहतूक बेटे तयार करण्यात आली आहेत. सुमारे पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी मालेगावात दोन-तीन ठिकाणीच वाहतूक बेटे होती. शहराचा विस्तार जसजसा वाढत गेला, नवनवीन रस्ते व चौक निर्माण होत गेले; तसतशी शहरातील वाहतूक बेटांची संख्याही वाढत गेली.

मालेगाव महानगरपालिकेतील अनेक नगरसेवकांच्या निधीतून, खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या खासदार निधीतून, तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या आमदार निधीतून मालेगावात गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी वाहतूक बेटे निर्माण करण्यात आली आहेत. मालेगावच्या विविध भागात सुशोभित व सौंदर्यीकरण केलेली वाहतूक बेटे पाहावयास मिळतात. चला तर मग मालेगावातील वाहतूक बेटे पाहायला…!

1) जुन्या आग्रा रस्त्याने गिरणा पुलावरून आपण जर मोतीबाग नाक्याच्या दिशेकडे आलो तर उजव्या हाताला असलेल्या रस्ता दुभाजकावर एका सायकलस्वाराची धातूची प्रतिकृती बसविलेली आपल्याला दिसते. सायकलस्वाराची प्रतिकृती वाहतूक बेटावर उभारण्याची कल्पना तशी नाविन्यपूर्णच म्हणावी लागेल! या प्रतिकृतीवरून सायकल ही मालेगावच्या जीवनशैलीचे प्रतिक असल्याचे उद्धृत तर होतांनाच ‘सायकल वापरा, प्रदूषण टाळा’ हा संदेशही दिला जातो.

2) तिथून पुढे आल्यानंतर निसर्ग हॉटेलजवळ एक सुंदरसे वाहतूक बेट अलिकडेच निर्माण करण्यात आले आहे . या वाहतूक बेटावर लामणदिव्याची मोठ्या आकाराची प्रतिकृती बसविण्यात आली आहे. लामण दिव्यातील वाती प्रज्वलित झालेल्या दाखविण्यात आल्या आहेत. लामणदिव्याच्या मधोमध मोर या राष्ट्रीय पक्ष्याची, फुललेल्या पिसाराच्या रूपातली उंच प्रतिकृती बसविण्यात आली आहे.

3) तेथून पुढे आल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा मोसमपूल चौकात आपल्याला दिसतो. या पुतळ्याभोवती एक छानसे गोलाकार वाहतूक बेट तयार करण्यात आले आहे. हे वाहतूक बेट जुनेच आहे.

4) सटाणारोडवरून सोयगावच्या दिशेला जात असताना उजव्या हाताला आपल्याला एक त्रिकोणी आकाराचे शिल्प दिसते. या शिल्पाकडून उजवीकडे जाणारा रस्ता साठफुटी रस्ता म्हणून ओळखला जातो. या शिल्पाकडे पाहतांना पहिल्यांदा आपलं लक्ष जातं ते जैन धर्माच्या प्रतिकाकडे. या प्रतिकावर तीन बिंदू, स्वस्तिक आणि अहिंसा हे शब्द लिहिलेला उजव्या हाताचा पंजा दाखविला आहे. पंजाच्या खाली ‘परस्परोपग्रहो जीवानाम्’ हे अतिशय अर्थपूर्ण वाक्य लिहिलेलं आहे. प्रतिकातील तीन बिंदू सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र यांचं प्रतिनिधित्व करतात तर स्वस्तिक हे चिन्ह देवता, मनुष्य, पशू-पक्षी आणि नरकातील जीवांचे प्रतिनिधित्व करते. या शिल्पाला पाच रंग दिले आहेत. ते पाच रंग सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांचे प्रतिक आहेत.

णमो अरिहंताणं णमो सिद्धाणं णमो आयरियाणं णमो उवज्झायाणं णमो लोए सव्व साहूणं एसोपंचणमोक्कारो, सव्वपावप्पणासणो मंगला णं च सव्वेसिं, पडमम हवई मंगलं या ‘नवकार मंत्रा’तील ओळी अहिंसा सर्कलवर लिहिलेल्या आहेत. या नवकार मंत्रालाच ‘णमोकार मंत्र’ असेही म्हटले जाते. या मंत्राचा अर्थ अतिशय सुंदर आहे. तो असा : अरिहंतांना नमस्कार असो, सिद्धांना नमस्कार असो, आचार्यांना नमस्कार असो, गुरुंना नमस्कार असो, सर्व साधूंना नमस्कार असो. असे हे पाच नमस्कार सर्व पापांचे हरण करतात . हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये सर्वाधिक मंगल मंत्र आहे. अहिंसा सर्कलवरील नवकार मंत्राच्या या ओळी वाचल्यानंतर मन खरोखरच प्रसन्न होते. या मंत्राच्या ओळी वाचणारा प्रत्येकजण एका पवित्र भावनेने या सर्कलवरून पुढे जातो!

5) मालेगाव कॅम्प भागात चर्चच्यासमोर एक छोटेसे वाहतूक बेट तयार करण्यात आले आहे. त्यावर पृथ्वीचा गोल बसविण्यात आला आहे. पृथ्वीच्या गोलावर गरुड पक्षाची प्रतिकृती बसविण्यात आली आहे.

6) महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या समोर एक अतिशय सुंदर असे वाहतूक बेट तयार करण्यात आले आहे. अभ्यास करणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनीचे दोन छोट्या आकाराचे पुतळे तिथे बसविण्यात आले आहेत.

7) कॅम्पातून मालेगाव शहराकडे जाताना, कॅम्परोडवर एकात्मता चौकातही एक छोटेसे वाहतूक बेट बनविण्यात आले आहे. हे वाहतूक बेट अगदी साधं आहे. एका चबुतर्‍यावर एकात्मतेचे प्रतीक म्हणून छत्री लावण्यात आलेली आहे. हे वाहतूक बेटही जुनेच आहे.

8) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याकडून संगमेश्वरात जात असताना रस्ता दुभाजकाच्या स्वरूपात असलेले एक अगदी छोटेसे वाहतूक बेट आपल्याला दिसते. त्यावर एक पक्षी आणि तिची पिले यांच्या छोट्या प्रतिकृती बसविण्यात आल्या आहेत.

9) संगमेश्वर महादेव मंदिरासमोरही अलीकडेच एक वाहतूक बेट तयार करण्यात आले आहे. त्यावर मोराची मोठ्या आकाराची प्रतिकृती बसविण्यात आली आहे. मोराची ही प्रतिकृती पिसारा मिटलेल्या स्वरूपातली आहे.

10) संगमेश्वर भागातच लिंगायत समाज मंगल कार्यालयाजवळ एक अतिशय सुंदर असे वाहतूक बेट अलीकडेच तयार करण्यात आले आहे. हाताच्या पंजावर शिवलिंग घेतलेली प्रतिकृती तेथे बसविण्यात आली आहे.

11) संगमेश्वर भागातल्याच वाल्मिकनगर टाऊन हॉलजवळ भवानी चौकात आपल्याला एक सुंदरसं वाहतूक बेट दिसेल. या बेटावर उभारण्यात आलेल्या प्रतिकृतीत स्त्री-पुरुषातील सृजनशीलता दाखविण्यात आली आहे. या प्रतिकृतीत आपल्याला हाताचे दोन पसरलेले पंजे एकत्र आलेले दिसतात. त्यापैकी एक पंजा आहे पुरुषाचा तर दुसरा पंजा आहे स्त्रीचा. स्त्री-पुरुषाच्या एकत्र आलेल्या या दोन पंजांवर एका नवजात बालिकेची छोटीशी प्रतिकृती दाखविण्यात आली आहे. या प्रतिकृतीतून स्त्री जन्माच्या स्वागताचा संदेश देण्यात आला आहे.

12) संगमेश्वर भागातून आपण सांडवा पुलावरुन जुन्या शहरात आलो की पूर्वीच्या सरदार टॉकीजपाशी एक जुने वाहतूक बेट आपल्याला दिसते. या वाहतूक बेटाचे सुशोभिकरण करण्यात आलेले नाही. हे वाहतूक बेट अतिशय जुनं आहे.

13) ए.टी.टी. विद्यालयासमोर असलेल्या जुन्या वाहतूक बेटाचं सुशोभीकरण अलीकडेच अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्यात आलं आहे. तेथे वाहतूक बेटाला लागून असलेल्या रस्ता दुभाजकावर मराठी उर्दू आणि इंग्रजी भाषेत भारतीय राज्यघटनेची उद्देशिका लिहिलेले तीन फलक लावण्यात आले आहेत. या फलकांमुळे वाहतूक बेटाच्या आणि मालेगाव शहराच्या सौंदर्यात खरोखरच भर पडली आहे!

14) जुन्या बसस्थानकाजवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा आहे. त्याभोवती लोखंडी पाईप लावून सुशोभिकरण करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असलेले हे वाहतूक बेटही शहरातले जुने वाहतूक बेट आहे.

15) तेथून आपण जुन्या आग्रारोडच्या दिशेने गेलो की आपल्याला समोरच एक वाहतूक बेट दिसते. त्या वाहतूक बेटावर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याभोवती देखील चांगले सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. हे वाहतूक बेट मोठे व जुने आहे.

16) उर्दू भाषेतील नामवंत कवी मोहम्मद इक्बाल उर्फ अल्लामा इक्बाल यांचे नाव मोसम नदीवरील एका पुलाला देण्यात आले आहे. मोतीबाग नाक्यावरून आपण या पुलावरून थेट चंदनपुरी गेटकडे जाऊ शकतो. या पुलाजवळ अलीकडेच एक वाहतूक बेट बनविण्यात आले आहे. या वाहतूक बेटावर यंत्रमागाची धातूची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. यंत्रमागाच्या प्रतिकृतीत तिरंगी कापड विणले जात असल्याचे दाखविण्यात आले आहे. यंत्रमाग हा मालेगावातील प्रमुख व्यवसाय! या व्यवसायाचे प्रतिक म्हणून यंत्रमागाची प्रतिकृती या वाहतूक बेटावर ठेवण्यात आली आहे. या वाहतूक बेटाची सजावटही अतिशय सुरेख पद्धतीने करण्यात आली आहे.

वाहतूक बेटांची निगा नाही

ए.टी.टी. विद्यालयासमोरील वाहतूक बेट, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेले शिवतीर्थ वाहतूक बेट आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा असलेले वाहतूक बेट ही आहेत मालेगावातली मोठी वाहतूक बेटे. मालेगाव शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक बेटे निर्माण करून ती सुशोभित करण्याची कल्पना चांगली आहे आणि वाहतूक बेटांची आज गरजही आहे.

मात्र आज जी काही वाहतूक बेटे मालेगावात आहेत त्यांची देखभाल नीट केली जात नाही. त्यांची स्वच्छता ठेवली जात नाही की तेथे काही आकर्षक फुलझाडं लावली जात नाहीत. एकदा वाहतूक बेट तयार झालं आणि त्याचं उद्घाटन झालं की मग वाहतूक बेटाकडं कोणीच लक्ष देत नाही. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर म.स.गा. महाविद्यालयाजवळील वाहतूक बेटाचं देता येईल. या वाहतूक बेटावर अभ्यास करणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनीचे दोन पुतळे बसवण्यात आले आहेत. त्यावर दोन दिव्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पण हे पुतळे पाण्याने धुतले जात नाहीत आणि पुतळ्यांवरचे दिवेही लावले जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थी -विद्यार्थिनी अंधारातच अभ्यास करीत आहेत की काय; असे वाटते!

असाच प्रकार चर्चसमोरील वाहतूक बेटाच्या बाबतीत आहे . या वाहतूक बेटावर असलेल्या पृथ्वीच्या गोलावर बरीच धूळ बसलेली असते. तिथले दिवेही निकामी झाले आहेत. रात्रीच्या वेळी हे वाहतूक बेट आणि त्यावरील पृथ्वीचा गोल व गरुड पक्षी अंधारातच असतात. बेटावर इतर वनस्पतीही वाढलेल्या दिसतात.

शहरातील काही वाहतूक बेटांवर जाहिराती चिकटविल्या जातात. त्यामुळे वाहतूक बेटांचे सौंदर्य कमी होऊन ती विद्रूप दिसू लागतात. वर्षानुवर्षे त्या जाहिराती तशाच असतात. वाहतूक बेटांवर जाहिराती चिकटवून ती विद्रूप करणार्‍यांवर खरं तर कायदेशीर कारवाई व्हायला हवी.

वाहतूक बेटांच्याभोवती माती साचलेली असते. अधूनमधून ती माती काढून वाहतूक बेटाभोवतालची जागा स्वच्छ करायला हवी. शौर्यतीर्थासमोरच्या रस्ता दुभाजकावर पक्ष्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. त्यावर देखील कायम धूळ बसलेली असते. या रस्ता दुभाजकाचं खरं तर आणखी सौंदर्यीकरण करता येईल.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या वाहतूक बेटाची अशीच गत आहे. या वाहतूक बेटाच्या समोरील रस्ता दुभाजकावर नेहमीच गवत आणि इतर वनस्पती उगवलेल्या असतात. वास्तविक अशा वाहतूक बेटांवर, वाहतूक बेटाचं सौंदर्य वाढवणार्‍या छोट्या छोट्या वनस्पती लावल्या आणि त्यांची निगा ठेवली तर ही वाहतूक बेटे पाहतांना नेहमीच प्रसन्न वाटेल! महानगरपालिकेने महिन्यातून एकदा तरी वाहतूक बेटांवर टँकरच्या साह्याने पाणी मारून वाहतूक बेटे स्वच्छ करणे आवश्यक आहे.

आणखी वाहतूक बेटांची आवश्यकता

मालेगावात रावळगाव नाका, मोची कॉर्नर, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, जिजामाता उद्यानाजवळील संत ज्ञानेश्वर चौक व इतर अनेक ठिकाणी वाहतूक बेटांची आवश्यकता आहे. वाहतूक बेटांचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी महापालिकेने तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काहीतरी उभारायचं म्हणून ही वाहतूक बेटे तयार केली जाऊ नयेत, असे वाटते. वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्याबाबतचा सल्ला देणार्‍या अनेक व्यक्ती व वास्तुरचनाकार मालेगाव शहरात आहेत. अशा व्यक्तींचा सल्ला घेऊन मालेगाव शहरात जर वाहतूक बेटे निर्माण केली आणि त्यांची योग्य पध्दतीने निगा राखली तर मालेगाव शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल!

- Advertisment -

ताज्या बातम्या