Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखयाची जाणीव कधी होणार?

याची जाणीव कधी होणार?

वाढती जातीयता, त्यावरून कलुषित होणारे वातावरण हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. राज्यातील अनेक शहरांना भेदाभेद आणि जातीय ताणतणावाची झळ पोचताना आढळते. मात्र फक्त शहरात जातीय ताणतणावांचे दृश्य स्वरूप समाजाच्या अनुभवास येते असे नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यातील छोट्या छोट्या गावांमध्ये, वाड्या-वस्त्यांमधील जातीय तेढीला कदाचित वाचा फुटतही नसेल. महाराष्ट्र हे देशातील पुढारलेले राज्य मानले जाते.

राज्याला लाभलेल्या परंपरा, संत आणि समाजसुधारकांच्या वारशाचा दाखला दिला जातो. त्यांनी चालवलेल्या चळवळींचा अभिमानाने उल्लेखही केला जातो. त्याशिवाय राजकीय नेत्यांच्या सभा क्वचितच पार पडत असतील. तो वारसा कुठे हरवला? का हरवला? तो पुढे चालवावा असे कोणालाही खरेच वाटत नसावे का? समाजातील तेढ गंभीर आहेच पण मनामनात ठाण मांडून बसलेल्या जातीपाती अधिक चिंताजनक आहेत. त्यामुळे अस्मितेला डोके वर काढण्यासाठी छोटेसे निमित्तही पुरे होते. आणि त्याचाच पुढे वणवा होण्याचा धोका वाढतो. याला आळा घालण्यासाठी कायदे आहेत. सामाजिक जागरूकतेसाठी सामाजिक संस्था कार्यरत आहेत. एकोप्याला बढावा मिळावा म्हणून अनेक सरकारी योजना आहेत. आंतरजातीय विवाह होतात. तरीही जातींवरून भेदाभेद का निर्माण होत असावा? सत्तेच्या राजकारणात जात महत्वाचा घटक बनला आहे. सर्वपक्षीय नेत्यांचे वर्तन दुटप्पी आढळते. व्यासपीठावरून सामाजिक सलोख्याच्या पुरस्कार करण्यात कोणीही मागे नसतात. निवणुकीचे वातावरण तयार होईपर्यंत हा सिलसिला सुरु असतो. निवडणूक जाहीर झाली की मग मात्र जातीपातीची गणिते मांडली जातात.

- Advertisement -

उमेदवारीचे तिकीट देण्याचा तो एक महत्वाचा निकष बनतो. ज्याची जातीय मतपेढी अधिक प्रभावी त्यालाच उमेदवारी मिळण्याची संधी. वरच्या पातळीवरचा हाच दृष्टीकोन खालपर्यंत पाझरतो. संत आणि समाजसुधारकांना देखील जातीपातीत वाटण्यात विधिनिषेध वाटेनासा होतो. उमेदवारी करण्याची इच्छा बाळगणारे जातीय प्रभाव वाढवण्याचे उपाय शोधतात. संघटना आणि सामाजिक संस्थांच्या निर्मितीला जाणत्यांचा आक्षेप फारसा आढळत नाही. तथापि त्याच्या मुळाशी जातीयता असायला जाणते विरोध करतात. निवडणुकीदरम्यान कधी थेट तर कधी अप्रत्यक्ष राजकीय बळही मिळते. राजकारणातील हौशा नवशा आणि गवशांना तो हक्क वाटू लागतो. आणि तिथेच समाज विघटनाची बीजे पेरली जातात. जातीपातींच्या खोट्या अभिमानापोटी माणसे पोटच्या गोळ्याचा जीव घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत. जातीबाह्य विवाह हे मुलींचा छळाचे किंवा जीव घेण्याचे प्रमुख कारण आहे. अशा वृथा अभिमानापोटी माणसांची मने दुभंगतात. वैचारिकता प्रभावित होते. त्यात परस्पर विश्वासार्हता, माणुसकीची धूळधाण होते. तथापि अंतिमतः त्यामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या ताणतणावाची आणि त्यामुळे क्वचित घडणाऱ्या दंगलीची झळ शेवटी सामान्य माणसांनाच बसते याची जाणीव कधी होणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या