नवीन बसस्थानक स्थलांतरास व्यापारी, नागरिकांचा विरोध

jalgaon-digital
3 Min Read

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

गत आठ वर्षांपासून कासवगतीने होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी नवीन बसस्थानकाचे (New Bus Stand) जुन्या बस स्थानकात स्थलांतर करण्याच्या मनपा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांना परिसरातील व्यावसायिक व नागरिकांतर्फे तीव्र विरोध करण्यात आला आहे. मध्यवर्ती बस स्थानकाचे स्थलांतर न करता इतर उपाययोजना करीत उड्डाणपुलाचे काम करावे, अशी जोरदार मागणी यावेळी संतप्त नागरिक व व्यावसायिकांतर्फे (Traders and citizens) आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्याकडे करण्यात आल्याने या संदर्भात प्रशासन समपोचाराने निर्णय घेईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली…

शहरातील जुना-आग्रा रोडवर उड्डाणपुलाचे काम गत आठ-नऊ वर्षापासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. या कामामुळे जुना आग्रा रोडवर वाहतूक कोंडी होऊन अपघाताच्या (Accident) घटना सातत्याने घडत आहे. काही दिवसापूर्वी मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी अधिकाऱ्यांसह उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी करत ठेकेदारास संथगतीने होत असलेल्या कामाबद्दल धारेवर धरले होते. यावेळी उड्डाणपुलाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांतर्फे ठेकेदारास देण्यात आले होते. मध्यवर्ती बसस्थानक असल्याने मोठ्या प्रमाणात बसेसची ये-जा जुना आग्रा रोड वरून सुरू असते. यामुळे उड्डाणपूल कामास अडचण येत असल्याने सदरचे बस स्थानक जुना बस स्थानकात स्थलांतरित करण्याबाबत मनपा प्रशासनातर्फे विचार केला जात होता.

या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, सहाय्यक आयुक्त सचिन महाले, शहर अभियंता कैलास बच्छाव आदी अधिकारी जुन्या बस स्थानकासह नवीन बसस्थानकाची पाहणी करण्यासाठी आले होते. मध्यवर्ती बस स्थानक स्थलांतरासाठी आयुक्तांसह अधिकारी बसस्थानकाची पाहणी करत असल्याची माहिती मिळताच भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष नितीन पोपळे, विजय ऐताळ, गोपाल प्रजापत, मनोज कायस्थ, अनिल पाटील, बशीर शेख, अनिल सोनवणे, युनुस खान यांच्यासह परिसरातील व्यावसायिक, नागरिक, रिक्षा चालक संघटना पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेत बस स्थानक स्थलांतरास कडाडून विरोध केला.

तर बसस्थानकाचे स्थलांतर केले गेल्यास या भागात वाहतूक पूर्णतः ठप्प होऊन त्याचा त्रास व्यावसायिक व नागरिकांना होणार आहे. तसेच एसटी बस देखील महामार्गावरून येणार असल्याने अंतर वाढवून प्रवाशांना तिकिटाच्या वाढीव पैशांचा दंड बसणार आहे. तसेच नवीन बसस्थानक परिसरातील व्यवसाय ठप्प होऊन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने हे स्थलांतर जनतेसह व्यावसायिकांच्या अडचणीचे ठरणार असल्याने ते करू नये,अशी मागणी संतप्त व्यावसायिक व नागरिकांतर्फे केली गेली. बसस्थानकांचे स्थलांतर करताना इतर उपाययोजना करीत उड्डाणपुलाचे (Flyover) काम प्रशासनाने करावी, अशी मागणी आयुक्त गोसावी यांच्याकडे करण्यात आली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *