Video लांडोर बंगला येथील धबधब्याची पर्यटकांना भुरळ

धुळे – dhule

शहरालगत असलेला लळींगचा किल्ला (fort) तसेच लांडोर बंगला ही स्थळे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतायेत. दोन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे (Heavy rain) कुरणातील बंधारे, वनतलाव तुडूंब भरून वाहू लागले आहेत. तर लांडोर बंगला येथील विशेष आकर्षण असलेला धबधबा (Waterfall) देखील खळखळून वाहतोय. त्यामुळे या परिसरात आता पर्यटकांची (Tourists) मोठी गर्दी होत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसापासून झालेल्या दमदार पावसाने येथील धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. शहरासह जिल्हावासीयांना जवळचे पर्यटन स्थळ असलेला लांडोर बंगला, लळींग किल्ला तसेच धबधबा आपल्या निसर्ग सौंदर्याने येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला अधिकच आकर्षित करतोय.

दमदार पावसामुळे संपूर्ण कुरण परिसर देखील हिरवाईने नटला असून जणू काही हिरवळीची चादरच पांघरल्याचे चित्र याठिकाणी निर्माण झाले आहे. त्यामुळे कुरणाच्या निसर्ग सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याकारणाने पर्यटकांना येथील निसर्ग सौंदर्य अनुभवता आले नाही. मात्र यंदा त्याची उणीव येथे येणारा प्रत्येक पर्यटक भरून काढतोय.