Tokyo 2020 Hockey : भारतीय हॉकी संघाने घडवला इतिहास; देशभरात जल्लोष, पाहा व्हिडिओ

दिल्ली | Delhi

भारतीय पुरूष हॉकी संघाने इतिहास रचला असून ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळाला संपवला. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला.

सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.

भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा देशभरात जल्लोष सुरू आहे. तसेच भारतीय खेळाडूंच्या कुटुंबीयांकडून आनंद साजरा केला जात आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनी आक्रमक खेळी करत होती. सामना सुरू झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच पहिला गोल डागत जर्मनीने आघाडी घेतली होती. पण, भारताने आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचे आव्हान संपुष्टात आणले. भारताचा गोलकिपर श्रीजेशने उत्तम खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले.

दोन्ही संघांमध्ये कांस्यपदकासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. अखेर भारताने जर्मनीचा धुव्वा उडवत विजय मिळवत कांस्य पदकाची कमाई केली. भारताकडून सिमरनजीत सिंग याने दोन तर हार्दिक सिंग, हरमनप्रीत सिंग आणि रुपिंदर पाल सिंग यांनी प्रत्येकी १-१ गोल केला.

ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला अखेरचे पदक १९८० मॉस्को ऑलिम्पिकमध्ये मिळालं होतं. तेव्हा वासुदेवन भास्करन यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकलं होतं. भारतीय पुरूष हॉकी संघाने आतापर्यंत ८ सुवर्ण पदक जिंकली आहेत.

भारताने १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४ आणि १९८० ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. याशिवाय १९६० मध्ये भारताने रौप्य पदकं जिंकलं. तर १९६८, १९७२ आणि २०२१ (टोकियो ऑलिंपिक २०२०) मध्ये कांस्य पदक आपल्या नावे केलं आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *