Thursday, April 25, 2024
Homeनगरबरे झाले... शौचालये पाडली !

बरे झाले… शौचालये पाडली !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील झारेकर गल्लीतील 18 शौचालये अज्ञात व्यक्तींनी पाडली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते हिताचेच झाले. कारण या स्वच्छतागृहांमुळे परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे, अशी तक्रार करत या जागेवर आता स्वच्छतागृहांऐवजी उद्यान उभारण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

झारेकर गल्लीतील 24 पैकी 18 स्वच्छतागृहे काही व्यक्तींनी शनिवारी रात्री जमीनदोस्त केली. हे काम कोणी व का केले? माहित नाही. परंतु परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने ते हिताचे झाले असल्याचे स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले. काही वर्षापूर्वी जेव्हा कोणाकडे शौचालय नव्हते, त्यावेळी या शौचालयाची गरज पडायची. मात्र आता प्रत्येकाच्या घरात शौचालयाची व्यवस्था असल्याने या स्वच्छतागृहाचा उपयोग स्थानिक नागरिकांना होत नव्हता.

तर रस्त्यावरून येणारे जाणारे व्यक्ती याचा वापर करत होते. मात्र या स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था नसल्याने परिणामी घाण होऊन परिसरात दुर्गंधी पसरत होती. त्याचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. झारेकर गल्लीत पाडण्यात आलेल्या स्वच्छतागृहाच्या जागेवर पुन्हा स्वच्छतागृह न उभारता उद्यान उभारण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी हर्षदा संदुपटला, योगेश नल्ला, वेणूगोपाल एकलपेल्ली, सुरज संदुपटला, अक्षय आकुबत्तीन, कैलास आगरकर, वैभव शिंदे, रमेश शेलार, संगिता सब्बन, सचिन पवार, वंदना मच्चा आदी उपस्थित होते.

असुरक्षितता अन् स्थलांतर

स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून हे स्वच्छतागृह इतर ठिकाणी हलविण्याची किंवा बंद करण्याची मागणी महापालिकेकडे करत होते. या स्वच्छतागृहाचा नागरिकांना मोठा त्रास होतो. स्वच्छतागृहातील अस्वच्छता, दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. परिसरात आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे या भागात राहणे असुरक्षित वाटू लागल्याने काहींनी दुसर्‍या ठिकाणी राहण्यासाठी स्थलांतर देखील केले, असे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या