Friday, April 26, 2024
Homeनाशिकअन 'टॉयलेट'मुळे मुली शाळेत येऊ लागल्या...!

अन ‘टॉयलेट’मुळे मुली शाळेत येऊ लागल्या…!

नाशिकरोड । Nashik

ऑस्ट्रेलियातील रोटरी क्लबच्या सहकार्याने रोटरी नाशिकरोडने जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जिल्ह्यातील ग्रामीण शाळांमध्ये टॉयलेट प्रोजेक्ट राबवला व हॅन्डवॉशची सुविधा दिली.

- Advertisement -

अकरा शाळांमधून एकूण 252 टॉयलेटस उभारले असून पावणे दोन कोटी रुपये खर्च आला आहे.या प्रकल्पामुळे 11 हजार विद्यार्थ्यांखेरीज शिक्षकांच्या आरोग्य संवर्धनास मदत होणार आहे. शाळा सोडून जाण्याचे मुलांचे प्रमाणही कमी होणार असल्याची माहिती माजी अध्यक्ष महेश साळवे यांनी दिली.

ग्रामीण शाळांमध्ये टॉयलेटची पुरेसी सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी विशेषतः मुली आजही शिक्षण अर्धवट सोडत असल्याचे ऑस्ट्रेलियातील रोटरीचे पदाधिकारी मार्क बल्ला यांना मुंबईतील धारावी झोपडपट्टीत पाहणीत आढळले. ते नाशिकरोडला वर्षातून एकदा भेट देतात.

त्यांनी टॉयलेटस प्रोजेक्टस राबविण्याची कल्पना सुचविली. त्यानुसार रोटरी नाशिकरोडचे अध्यक्ष डॉ. अमित गांगुर्डे, सचिव ओ.पी. श्रीवास्तव, खजिनदार हेमंत शिधये, फिरदोस कपाडिया, प्रांतपाल शब्बीर शाकीर आदींच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट सुरु झाला आहे.

येथे झाला प्रकल्प

या प्रकल्पांतर्गत विहितगाव, सिन्नर, डुबेरे, आहुर्ली, वाघेरे, बारगावपिंप्री, पळसे, चितेगाव, तळेगाव, हिंगणवेढे येथे टॉयलेटस बांधण्यात आली आहेत. पांगरी, सय्यदपिंप्री, कोळमगाव, गुंजाळवाडी, तुंगलधारा येथेही काम सुरु असून कळवण, चांदोरी, त्र्यंबकेश्वर, भगूर आदी भागातील शाळांनीही अर्ज केले आहेत. जेथे पाणीप्रश्न आहे तेथे रोटरी बोअर वेल करुन देते. ऑस्ट्रेलियाचे तज्ज्ञ नियमित येऊन या प्रोजेक्टचे ऑडीट करतात.

शिक्षण, आरोग्यसंवर्धन

मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बील गेटस यांनी असे नमूद केले आहे की, भारतातील अनेक शाळांमध्ये टॉयलेटस नसल्याने 25 टक्के मुली शिक्षण अर्धवट सोडतात. टॉयलेटस नसल्याने मुले-मुली लघुशंकेला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मूत्रपिंडाचे गंभीर आजार जडतात. वर्ल्ड इकॉनामिक फोरमच्या अहवालानुसार जगात 17 लाख लोकांचा मूत्रविकाराने दरवर्षी मृत्यू होतो. त्यातील सहा लाख भारतातील आहेत. इंडिया स्पेन्ड रिपोर्टसनुसार भारतात 7 कोटी 32 लाख लोकांना टॉयलेटस नाहीत. 23 टक्के ग्रामीण मुली टॉयलेटस अभावी शाळा सोडतात.

अशी मिळते मदत

रोटरी क्लब दरवर्षी मॅरेथॉनसह विविध उपक्रम राबवते. त्यातून मिळणार्‍या निधीतून टॉयलेटस प्रोजेक्ट, शिवणकाम वर्ग, गरीब विद्यार्थ्यांना फीसाठी मदत व सायकल वाटप, अपंगांसाठी जयपूर फूट शिबिर, रुग्णवाहिका, गुणवंतांचा सत्कार, अन्न, किराणा व कपडे दान, अंधासाठी रक्षाबंधन आदी उपक्रम मोफत राबवले जातात. यंदा करोनामुळे रोटरी नाशिकरोडने व्हर्चुअल मॅरेथॉन घेतली. त्याला भारतातील 19 राज्ये तसेच 17 देशातील नागरिकांनी सहभाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या