Saturday, May 11, 2024
Homeनगरपोलिसांच्या जाचाला कंटाळून युवकाची आत्महत्या

पोलिसांच्या जाचाला कंटाळून युवकाची आत्महत्या

बोधेगाव |प्रतिनिधी| Bodhegav

तालुक्यातील बालमटाकळी येथील आदित्य अरुण भोंगळे (वय 17) या युवकाने शेवगाव पोलिसांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

अदित्य भोंगळे याला शेवगाव पोलीस ठाण्याच्या चार पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी दुचाकी चोरीच्या व गावठी कट्टा खरेदी विक्री प्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. नंतर त्याला पोलिसांनी सोडून दिले. मंगळवारी रात्री त्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणला होता. दरम्यान, मयत अदित्यची आई संगीता भोंगळे यांनी सांगितले की, माझ्या मुलाला पैशासाठी पोलीस त्रास देत होते. त्यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली. मी बचत गटाचे पैसे काढून 47 हजार रुपये पोलिसांना दिले. राहिलेले तीन हजार रुपये पोलिसांनी दिलेल्या मोबाईल नंबर वर फोन पे व्दारे पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान या घटनेनंतर शेवगाव शहरातील आंबेडकरी चळवळीचे नेते, कार्यकर्ते यांनी दुपारी चार वाजता अदित्य भोंगळे याचा मृतदेह शेवगाव पोलीस ठाण्यात आणला. दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल न झाल्यास त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे घटनास्थळी आले आणि मयत अदित्यच्या आईचा इन कॅमेरा जबाव घेऊन दोषी पोलीसांवर ठोस कार्यवाही करू, असे आश्वासन दिल्यावर मृतदेह अंत्यविधीसाठी पाठविण्यात आला.

यावेळी पवन कुमार साळवे, शिवसेना तालुका अध्यक्ष तथा माजी सभापती अ‍ॅड. आविनाश मगरे, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, माजी सभापती प्रकाश भोसले, आरपीआयचे तालुका अध्यक्ष विजय बोरुडे, बाजार समितीचे माजी सभापती अनिल इंगळे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊराव भोंगळे, अनिल कांबळे, वंचितचे तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे, शेवगावचे माजी सरपंच राहुल मगरे, नगरसेवक प्रविण भारस्कर, अनिल बोरूडे, संतोष बानायत, भगवान मिसाळ, कडू मगर, राजू मगर, अरुण भोगळे, रोहीदास भोंगळे, संतोष पटवेकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या