Friday, April 26, 2024
Homeनगरतीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याज दराने

तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याज दराने

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकर्‍यांच्या तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्जाला केंद्र सरकार व राज्य सरकारकडून देण्यात येणार्‍या व्याज परताव्याच्या सवलतीमुळे 2 टक्के व्याज आकरणी होत होती. आता ही 2 टक्के व्याजाची आकारणी जिल्हा बँकेने ‘स्व’ निधीतून भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना यापुढे 1 ते 3 लाखांपर्यंत पीक कर्ज हे शून्य टक्क्यांनीच मिळणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली. ऐन करोना संसर्गात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हा आर्थिक दिलासा ठरणार आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जिल्हा सहकारी बँकेमार्फत मोठ्या प्रमाणावर पीक कर्ज वाटप होते. बँकेमार्फत देण्यात येणार्‍या पीक कर्जासाठी रुपये 1 लाखापर्यंत पीक कर्जासाठी शून्य टक्के तर रुपये 1 लाखाच्यापुढे ते रुपये 3 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी शेतकर्‍यांना रुपये 2 टक्के व्याज भरावे लागत होते. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या व्याज परताव्याच्या सवलतीमुळे हे व्याज लागत होते.

- Advertisement -

मात्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जदार शेतकरी सभासदांना आता 1 लाखापुढे ते 3 लाखापर्यंतच्या पीक कर्जासाठी भरावे लागणारे 2 टक्के व्याज बँकेच्या ‘स्व’निधीतून भरण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन गायकर, व्हाईस चेअरमन रामदास वाघ, ज्येष्ठ संचालक माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.

बँकेच्या या निर्णयामुळे शेतकर्‍यांना बँकेमार्फत दिल्या जाणार्‍या रुपये 3 लाखांच्या पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याजदर लागणार असल्याने अडचणीत असणार्‍या शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

याबाबत अध्यक्ष गायकर यांनी सांगितले की, चालू खरीप हंगामात 1 लाख 70 हजार शेतकरी सभासदांना रुपये 1 हजार कोटीचे पीक कर्ज वाटप केले आहे. बँकेस खरीप हंगामासाठी रुपये 1 हजार 498 कोटीचे व रब्बी हंगामासाठी रुपये 809 कोटीचे असे एकूण 2 हजार 307 कोटीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट बँक वेळेत पूर्ण करणार आहे.

बँकेने नेहमीच जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतलेले असून बँकेने नुकतेच संयुक्त उतारा असलेले शेतकरी सभासद, पीक कर्ज सोडून मध्यम व दीर्घ मुदतीचे इतर बँकेकडून कर्ज घेणारे कर्जदार शेतकरी सभासद, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मात्र, शासनाकडून कर्जमाफीची रक्कम प्राप्त न झालेल्या शेतकरी सभासदांसाठी पीक कर्जपुरवठा करण्याचा निर्णय यापूर्वीच जिल्हा बँकेने घेतलेला असल्याने बँके मार्फत मोठ्या प्रमाणात पीक कर्ज वाटप होत असल्याचे अध्यक्ष गायकर यांनी सांगितले.

बँकेच्या याच निर्णयाबरोबर भोगवटादार नंबर 2 जमीन धारणा प्रकरणातील अनेक शेतकरी सभासद असल्याने व त्यांनी वारंवार पीक कर्जाची मागणी बँकेकडे केली आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे बँक या शेतकरी सभासदांना कर्ज पुरवठा करू शकत नव्हती. चालूवर्षी पाऊस चांगला आहे. करोना संकटामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला असल्याने अशा भोगवटादार नंबर 2 जमीन धारणा प्रकरणातील सभासदांनाही कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. भोगवटादार नंबर 2 जमीन धारणा प्रकरणातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात बँक शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. शासन देखील याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचा विश्वास अध्यक्ष गायकर पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या