थोरात-विखे गटाच्या अखेरच्या तासांत दंडबैठका

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस असून तीन वाजेपर्यंतच माघारीची मुदत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक होणार की बिनविरोध याकडे लक्ष लागून असतानाच

मंत्री बाळासाहेब थोरात हे नगरमध्ये आले आहेत. त्यांनी नगर शहरात प्रमुख नेत्यांची बैठक सुरू केली असून दुसरीकडे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचीही विळद घाटात बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची गुप्त ठिकाणी खलबते सुरू आहेत. थोरात गटासोबत असणारे दुसर्‍या फळीतील नेत्यांची जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या लालटाकी येथील निवासस्थानी गर्दी जमली आहे.

बाळासाहेब साळुंके, ज्ञानदेव वाफारे, किरण काळे, अभिजीत लुणिया, रावसाहेब शेळके, राजेंद्र नागवडे, सचिन गुजर, संभाजी रोहोकले, प्रशांत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, अमित भांगरे, सिध्दार्थ मुरकुटे, सुरेश गडाख, बाळासाहेब जगताप, काकासाहेब नरवडे हे लालटाकी येथील बंगल्यात खल करत आहेत. उदय शेळकेही तेथे पोहचले आहेत.

मतदान की बिनविरोध…आज फायनल स्ट्रोक!

जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत विखे विरोधात सारे (थोरातगट) असे चित्र आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. मंत्री थोरात यांचे बँक निवडणूक बिनविरोधाचे प्रयत्न असले तरी विखे पाटील यांच्या भूमिकेवर बरंच काही अवलंबून आहे. त्यामुळे विळद घाटातील विखे यांच्या बैठकीकडेही नगरकरांचे लक्ष लागून आहे.

जिल्हा बँकेसाठी कालपासून खासदार डॉ.सुजय विखे सक्रिय झाले आहेत. त्यांनी भाजपातील नेत्यांशी फोनवरून चर्चा सुरू केली होती. त्यामुळे विखे पिता-पुत्र जिल्हा बँक निवडणुकीत कसे आव्हान उभे करणार याची उत्सुकता आहे.

दरम्यान, यावेळी विखे गटाशी सहमतीचा विषयच येत नाही, असे थोरात गटातील एक नेत्याने म्हटले आहे. पवार-थोरात यांची मतदान घेऊन ताकद आजमावून घेण्याची इच्छा असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे विखे गटाशी बिनविरोधसाठी चर्चेची वेळच येणार नाही, असाही अंदाज आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *