Wednesday, April 24, 2024
Homeधुळेधुळ्यात चोरट्यांचा कहर; दोन एटीएम फोडले

धुळ्यात चोरट्यांचा कहर; दोन एटीएम फोडले

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरा चोरट्यांनी कहर केला असून पोलिस निरीक्षकाकडील घरफोडीची घटना ताजी असतांनाच चोरट्यांनी देवपूरातील पंचवटीसह चितोड रोडवरील क्रांती चौकाजवळील खाजगी बँकांचे एटीएम फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

मात्र या दोन्ही ठिकाणी चोरट्यांना अपयश आले. नेमके पैसे असलेला कप्पाच चोरट्यांना फोडता न आल्याने बँकेची रोकड वाचली. मात्र साहित्य काही लंपास केले आहे.

दरम्यान जमनागिरी परिसरातील भावसार कॉलनीतही पुन्हा घरफोडी करून चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. चोरीच्या वाढत्या घटनामुळे पोलिसांची रात्रीची गस्त खरचं होत का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

शहरातील चितोडरोडवर असलेल्या क्रांती चौकात मोगलाईकर यांच्या कॉम्प्लेक्समध्ये इंडिकॅशचे एटीएम आहे. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास हे एटीएम फोडल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक नितीन देशमुख, एपीआय.दादासाहेब पाटील तसेच शोध पथकातील हेकॉ.डी.सी.पाटील, पोना.मुक्तार मन्सुरी, संदीप पाटील, पोकॉ.पंकज खैरमोडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

तसेच ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. टेकिनशियनला देखील बोलविण्यात आले. त्याने एटीएममधून पैसे चोरीस गेले नसल्याचा सांगितले. केवळ तोडफोड झाल्याचे दिसून आले. यावेळी श्वानाने एटीएमच्या मागील बाजूस असलेल्या शिव मंदिरापर्यंत माग काढला.

पोलिसांच्या सूचनेवरुन या एटीएममध्ये असलेल्या कॅमेर्‍यातील फूटेजची तपासणी टेक्नीशियनच्या माध्यमातून केली जाणार आहे.

दरम्यान चोरट्यांना एटीएम फोडून रोख रक्कम मिळवता आली नसली तरी त्यांनी तेथील युपीएसच्या तीन बॅटर्‍या लंपास केल्या आहेत. तसेच अंदाजे 20 ते 25 हजाराचे नुकसान झाल्याची माहिती बँकेच हेमंत पवार यांनी दिली आहे.

देवपूरातही फोडले एटीएम- चोरट्यांनी देवपूरातील पंचवटी परिसरातील आर्कीटेक्ट रवी बेलपाठक यांच्या जागेत असलेल्या अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएमही फोडण्याचा प्रयत्न केला आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

माहिती मिळताच देवपूर पोलिस ठाण्याचे एपीआय चंद्रकांत पाटील, पीएसआय.लोकेश पवार, हेकॉ.पारस चिंचोलीकर, किरण साळवे, आखडमल, सुर्यवंशी, वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. त्यानंतर अ‍ॅक्सीस बँकेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात आला.

तसेच टेक्नीशियनने बोलविण्यात आले. त्याने तपासणी केली असता चोरट्यांनी कुठलीही रोकड चोरून नेली नसल्याचे सांगितत्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र एटीएमची तोडफोड केल्याने नुकसान झाले आहे.

वरिष्ठ अधिकर्‍यांनी केली पाहणी

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, एलसीबीचे निरिक्षक शिवाजीराव बुधवंत यांनीही क्रांती चौकासह देवपूरातील अ‍ॅक्सीस बँकेच्या एटीएमला भेट पाहणी केली.

भावसार कॉलनीत पुन्हा घरफोडी

शहरातील जमनागिरी परिसरात असलेल्या भावसार कॉलनीत चोरट्यांनी पुन्हा घरफोडी केली आहे. कॉलनीतील चंद्रकांत राक्षे यांच्या मालकीच्या प्लॉट नं.5 मध्ये संदीप मोहन वैराग हे भाडेकरू म्हणून रहातात. ते सिंचनभवन येथे नोकरीला आहेत. ते गेल्या शनिवारी मुलाचा वाढदिवस असल्याने कुटुंबियांसह साक्रीला राहणार्‍या आई-वडिलांकडे गेले होते. त्यामुळे घर बंद होते.

ही संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील अडीच ते तीन हजारांची रोकड व सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला. संदीप वैराग हे सकाळी आले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान दोन दिवसांपुर्वीच कॉलनीतील वळवी कुटुंबाकडे चोरी झाली होती. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे कॉलनीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सीसीटीव्ही फुटेजची मदत

इंडीकॅश आणि अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम फोडणारे चोरटे एकच असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस दोन्ही एटीएममधील व परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची माहिती मिळवित आहेत.

तर देवपूरातील आर्किटेक्ट रवी बेलपाठक यांच्या इमारतीतील सीसीटिव्ही फूटेजची पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान एकाच रात्री चोरट्यांनी शहरातील दोन एटीएम फोडल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे आहे.

त्या घटनेची आठवण

आर्किटेक्ट रविंद्र बेलपाठक यांच्या निवासस्थानाच्या डाव्या बाजुलाही एक एटीएम असून काही वर्षापूर्वी त्या एटीएमवर चोरट्यांनी दरोडा टाकला होता. त्यात सुरक्षा रक्षकाचा खून केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे तेव्हा शहरात एकच खळबळ उडाली होती. आजच्या घटनेने या घटनेचीही चर्चा झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या