Wednesday, April 24, 2024
Homeनगरचोरट्यांच्या मारहाणीत बाप-लेक जखमी

चोरट्यांच्या मारहाणीत बाप-लेक जखमी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बाप-लेकाला लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करीत घरातील सुमारे दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने व 20 हजार रूपयांची रोकड असा 77 हजार रूपयांचा ऐवज तीन चोरट्यांनी लंपास केला. मारहाणीत बाप-लेक जखमी झाले आहेत. गुरूवारी पहाटे तांदळी वडगाव (ता. नगर) शिवारात ही घटना घडली.

- Advertisement -

एकनाथ जयवंत दिघे (वय 76) व राजेंद्र एकनाथ दिघे (वय 45) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी मंगल राजेंद्र दिघे (वय 35) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी पहाटे तीन चोरट्यांनी दिघे यांच्या घराच्या किचन रूमची खिडकी कशानेतरी उचकटून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरात प्रवेश करताच मंगल दिघे यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने एकनाथ दिघे व राजेंद्र दिघे यांना मारहाण केली. चोरट्यांनी घरातील सुमारे दोन तोळ्यांचे दागिने व 20 हजार रूपयांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या