Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवीज दरवाढीविरोधात आंदोलन व्हायला हवे!

वीज दरवाढीविरोधात आंदोलन व्हायला हवे!

नाशिक / Nashik । प्रतिनिधी

वाढीव वीजबिलांचा प्रश्न गाजत आहे. काही ठिकाणी वीजबिलांची होळी केली जात आहे. आता जी बिले दिली गेली आहेत ती वाढीव दराने आकारली गेली आहेत. ही वीजदरवाढ 1 एप्रिलपासून अंमलात आली आहे. याविषयी राज्य वीज ग्राहक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रताप होगाडे यांची मुलाखत.

- Advertisement -

वीजबिल वाढीमागची कारणे कोणती?

राज्यातील बहुतेक सगळ्याच ग्राहकांना वाढीव वीजबिले आली आहेत. याची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले : दरवर्षी मार्च ते जून या काळात उन्हाळा असतो. या तीन महिन्यांत वीजबिल थोडेसे वाढीवच येत असते. यावर्षी याच काळात लॉकडाऊन आहे. सगळेच घरात आहेत. त्यामुळे घरातील सगळे पंखे, दिवे, संगणक, कूलर आदी वस्तूंचा आणि पर्यायाने विजेचा वापर वाढला आहे.

दुसरे कारण जास्त महत्त्वाचे आहे. 1 एप्रिलपासून विजेच्या दरात वाढ झाली आहे. त्यानंतर पहिलेच बिल ग्राहकांना दिले गेले आहे. आता जे तीन महिन्यांचे एकदम बिल वाढीव दराने दिले गेले आहे त्यातील अडीच महिने वाढीव दराचे आहेत. वीज दरवाढ झाली आहे हे किती ग्राहकांना माहिती आहे? त्यामुळेच वीजबिल चुकीचे आले आहे, असा समज झाला आहे.

ग्राहक निषेध नोंदवत आहेत. वीजबिलांची होळी केली जात आहे. याबद्दल काय सांगाल?

लॉकडाऊनमुळे बहुसंख्य कुटुंबांची आर्थिक स्थिती डळमळीत आहे. गाठीचे पैसे संपलेले आहेत. त्यातच वाढीव बिल आल्याने संताप होणे स्वाभाविक आहे. तथापि यातील मेख समजून घ्यावी. वीजबिलांच्या विरोधात आंदोलनाऐवजी विजेच्या दरवाढीविरोधात ग्राहकांनी आवाज उठवावा.

तो कसा उठवला पाहिजे?

वीज दरवाढ 1 वर्षाकरता रद्द करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली पाहिले. त्यासाठी आंदोलन केले पाहिजे. दरमहा 300 युनिट वीज वापरणार्‍या ग्राहकांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी संघटना करणार आहे. त्यासाठी 13 जुलै रोजी राज्यभर आंदोलन करणार आहे.

दरवाढ केव्हा जाहीर झाली?

22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. वीज नियामक आयोगाने 30 मार्च रोजी दरवाढ जाहीर केली आणि ती लगेचच 1 एप्रिलपासून अंमलातही आणली. याकाळात लॉकडाऊनमुळे वर्तमानपत्रे सगळ्यांपर्यंत पोहोचत नव्हती. लोकांना खूप दिवसांनी मोकळा वेळ मिळाला होता. तो एन्जॉय करायचा मूड होता. अशा वेळी किती लोक बातम्या लक्ष देऊन ऐकत होते? माध्यमांमध्येही दरवाढीची चर्चा झाली नाही. त्यामुळे जेव्हा दरवाढ घोषित झाली तेव्हा ती ग्राहकांपर्यंत पोहोचलीच नाही. आता ती थेट वाढीव बिलांच्या माध्यमातूनच त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात दरवाढ स्थगित ठेवली असती तर काय बिघडले असते? असा आमचा प्रश्न आहे.

याचा अर्थ स्थिर आकार, वहन आकार, वीज आकार ही दरवाढ 100 युनिटसाठी 16 टक्के आणि 100 युनिटस्च्या वरच्या ग्राहकांसाठी 13 टक्के आहे. याचा दुसरा अर्थ, कमी वीज वापरणार्‍या ग्राहकांना जास्त वीजबिल आणि जास्त वीज वापरणार्‍या ग्राहकांना त्याच्या तुलनेत कमी वीजबिल भरावे लागेल. या अन्यायकारक दरवाढीविरोधात ग्राहकांनी आंदोलन करायला हवे.

वाढ कशी आहे ?

नाव 1 एप्रिल पूर्वी 1 एप्रिल नंतर

स्थिर आकार 90 रुपये 100 रुपये

वहन आकार प्रति युनिट 1.28 रूपये 1. 45 रुपये

वीज आकार पहिले 100 युनिट 3.05 रुपये 3.46 रुपये

101 ते 300 युनिट 6.95 रुपये 7.43 रुपये

301 ते 500 युनिट 9.90 रुपये 10.32 रुपये

- Advertisment -

ताज्या बातम्या