Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमीमांसा ‘कोसळत्या विद्युल्लतेची’

मीमांसा ‘कोसळत्या विद्युल्लतेची’

– प्रा. रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

वीज पडण्याच्या घटना वाढत जाण्याचे महत्त्वाचे कारण पृथ्वीचे वाढते तापमान हेच आहे ही बाब समजून घेतली पाहिजे. पूर्वी आषाढ महिन्यात जोरदार पाऊस कधीच होत नसे, हे सर्वांना आठवत असेल. परंतु आता तसे होऊ लागले आहे. अगदी थोड्या काळात अचानक खूप अधिक पाऊस होणे आणि नंतर श्रावण आणि भाद्रपद महिने कोरडे जाणे यालाच जलवायू परिवर्तनाची समस्या म्हणतात आणि वीज कोसळण्याच्या घटना वाढणेही त्याचेच फलित आहे.

- Advertisement -

आकाशात कडाडणारी वीज आपण सर्वांनी पाहिलेली असते. वीज कडाडण्याच्या प्रक्रियेची सुरुवात वादळाच्या रूपात ढग एकत्रित येण्याने होते. अशा प्रकारे वाढत्या वादळाच्या केंद्रस्थानी बर्फाचे छोटे-छोटे कण आणि अत्यंत थंड असे पाण्याचे थेंब एकमेकांना धडकतात आणि त्यांच्या दरम्यान विरुद्ध ध्रुवीय विद्युतकणांचा प्रवाह होतो. तसे पाहायला गेल्यास धन आणि ऋण प्रवाहभारित कण एकमेकांना चुंबकाप्रमाणे आकर्षित करतात; परंतु वायू हा एक उत्तम वाहक नसल्यामुळे विजेच्या आवेशात अडथळा उत्पन्न होतो. त्यामुळे ढगाच्या ऋणभारित खालील पृष्ठभागाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारे धनभारित तरंग जमिनीवर कोसळतात. जमीन ही विजेची वाहक असल्यामुळे ढगांच्या मधल्या थराच्या तुलनेने अपेक्षेपेक्षा धनभारित होते. म्हणूनच अशा प्रकारे निर्माण झालेल्या विजेचा अंदाजे 20 ते 25 टक्के प्रवाह जमिनीकडे वाहतो. भारतात अशा प्रकारे वीज कोसळल्याने सुमारे दोन हजार लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात. शिवाय गुरेढोरे, घरे आदींचेही मोठे नुकसान होते.

मान्सूनचे आगमन होताच गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये विजा कोसळून 27 जणांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्यांची संख्याही तीसपेक्षा अधिक आहे. राज्याच्या दक्षिण भागात हुगळीमध्ये 11 तर मुर्शिदाबादमधील 9 जण अशा घटनांना बळी पडले. मिदनापूर, बांकुरा आदी जिल्ह्यांतही असे मृत्यू झाले आहेत. बंगालच्याच शेजारी असलेल्या झारखंडमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये डुमका आणि रामगढ जिल्ह्यांतील पाच जणांचा मृत्यू झाला. याच वर्षी 9 एप्रिल रोजी पूर्वांचल-उत्तर प्रदेशातील मिर्जापूर आणि भदोही या दोन जिल्ह्यांत वीज कोसळून तिघांचा अंत झाला तर अनेकजण जखमी झाले. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजा पडणे आणि त्यामुळे एवढी मोठी मानवी जीवितहानी होणे ही सामान्य घडना नाही.

अमेरिकेत वीज पडल्यामुळे दरवर्षी तीस जणांचा तर ब्रिटनमध्ये दरवर्षी तीन जणांचा मृत्यू होतो. भारतात हा आकडा फारच मोठा आहे. आपल्या देशात सुमारे दोन हजार लोक दरवर्षी वीज कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडतात. याचे मुख्य कारण असे की विजेच्या कडकडाटाचे पूर्वानुमान आणि इशारा देणारी प्रणाली आपल्याकडे विकसित होऊ शकलेली नाही. आपल्याकडे बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये वीज पडण्याच्या घटना जास्त होतात, असे आकडेवारी सांगते. वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना सहसा दिवसाच घडतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

जेव्हा जोरदार पाऊस पडत असेल आणि विजा कडाडत असतील, तेव्हा पाण्याने भरलेल्या शेतात किंवा झाडाखाली उभे राहणे टाळायला हवे. अशा वेळी डोंगरावर जाणेही टाळायला हवे. अशा वेळी मोबाइलचा वापर करणेही धोकादायक ठरू शकते. पूर्वी घरावर त्रिशुळासारखी धातूची आकृती उभी केली जात असे. त्याला वीजचालक म्हटले जात असे. वीज पडल्यामुळे होणार्या नुकसानीपासून त्यामुळे बचाव करता येत असे. वस्तुतः या त्रिशुळासारख्या आकाराला एक धातूची जाड तार किंवा पट्टी जोडली जात असे आणि ती जमिनीत खोल गाडली जात असे, जेणेकरून आकाशातून कोसळणारी वीज त्या माध्यमातून जमिनीत उतरू शकेल आणि त्या विजेपासून कोणतेही नुकसान होणार नाही.

एखाद्या परिसरात सातत्याने वीज पडण्याच्या घटना वाढत जाण्याचे महत्त्वाचे कारण पृथ्वीचे वाढते तापमान हेच आहे ही बाब समजून घेतली पाहिजे. पूर्वी आषाढ महिन्यात जोरदार पाऊस कधीच होत नसे, हे सर्वांना आठवत असेल. परंतु आता तसे होऊ लागले आहे. अगदी थोड्या काळात अचानक खूप अधिक पाऊस होणे आणि नंतर श्रावण आणि भाद्रपद महिने कोरडे जाणे यालाच जलवायू परिवर्तनाची समस्या म्हणतात आणि वीज कोसळण्याच्या घटना वाढणेही त्याचेच फलित आहे. जसजसे जलवायू परिवर्तन होत आहे, तसतशा वीज पडण्याच्या घटना अधिक वाढत चालल्या आहेत. आणखी एक गोष्ट अशी की, वीज पडणे हा जलवायू परिवर्तनाचा दुष्परिणाम तर आहेच; शिवाय वीज पडण्याच्या घटना वाढण्यामुळे जलवायू परिवर्तनाच्या प्रक्रियेला गतीही मिळते.

वीज कोसळत असताना नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन होते, हे समजून घ्यायला हवे आणि हा एक अत्यंत घातक असा हरितगृह वायू आहे. अर्थात वीज कोसळण्याच्या घटना आणि त्याचे जलवायू परिवर्तनाच्या प्रक्रियेवर होणारे परिणाम याविषयी आतापर्यंत जगात फारच मर्यादित संशोधन झाले आहे. परंतु अनेक महत्त्वपूर्ण संशोधनांमधून असे दिसून आले आहे की, जलवायू परिवर्तनामुळे वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या विषयावर अधिक विस्तृत काम करण्यासाठी ग्लोबल क्लायमेट ऑब्जर्विंग सिस्टिमच्या शास्त्रज्ञांनी जागतिक हवमान विज्ञान संघटनेसोबत एकत्र येऊन एका विशेष संशोधन गटाची स्थापना केली आहे.

पृथ्वीच्या दररोज वाढत असलेल्या तापमानाचा थेट परिणाम वातावरणावर होतो आणि त्यामुळेच भयावह अशा वादळांची निर्मितीही होत असते. वीज पडण्याचा थेट संबंध पृथ्वीच्या तापमानाशी आहे, कारण जसजसे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे, तसतशी आकाशातील वीज जमिनीकडे अधिक प्रमाणात आकर्षित होत आहे. वीज पडण्याच्या घटनांचा थेट संबंध ढगांच्या वरील ट्रोपोस्फेरिक किंवा क्षोभ मंडल जल बाष्प आणि ट्रोपोस्फेरिक ओझोनच्या थराशी आहे. जलवायू परिवर्तनाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भविष्यात जर जलवायूचे तापमान आणखी वाढले तर गरजणारी वादळे कमी; परंतु वेगवान वादळे अधिक येतील. जगाचे तापमान जितक्या अंशांनी वाढेल, त्यातील एकेका अंशाबरोबर वीज कोसळण्याचे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढू शकेल.

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या बर्कले येथील शास्त्रज्ञांनी मे 2018 मध्ये वायुमंडलावर प्रभाव टाकणार्या घटकांचा आणि वीज पडण्याच्या घटनांचा संबंध जाणून घेण्यासाठी एक संशोधन केले होते. त्याचा निष्कर्ष असा होता की, आकाशातील विजेचा कडकडाट आणि वीज पडण्याच्या घटनांसाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. तीनही अवस्थांमधील (घन, द्रव आणि वायूरूप) पाणी आणि बर्फ बनण्यापासून रोखणारे घनदाट ढग. शास्त्रज्ञांनी 11 वेगवेगळ्या जलवायू मॉडेलवर प्रयोग केले आणि त्याना असे आढळून आले की, भविष्यात हरितगृह वायू उत्सर्जन थांबणे अथवा कमी होणे शक्य नाही आणि त्याचा थेट परिणाम म्हणून आकाशातून वीज कोसळण्याच्या घटना वाढतील. वातावरण जेवढे अधिक गरम होईल, जेवढे हरितगृह वायूंचे अधिक उत्सर्जन होईल, तेवढीच वीज अधिक वेगाने आणि ताकदीने जमिनीकडे झेपावेल.

जियोफिजिकल रिसर्च लेटर्स नावाच्या ऑनलाइन नियतकालिकाच्या मे 2020 च्या अंकात प्रकाशित झालेल्या एका अध्ययनात अल नीनो-ला नीना, हिंदी महासागर डाय आणि दक्षिण एन्यूलर मोडचे जलवायू परिवर्तनावर होणारे परिणाम आणि त्यामुळे दक्षिण गोलार्धात वाढत असलेल्या तापमानाचे दुष्परिणाम त्याचबरोबर आकाशातून वीज पडण्याच्या घटनांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मान्सूनमध्ये वीज चमकणे ही अगदी साधारण घटना आहे. वीज तीन प्रकारची असते. ढगाच्या आत कडाडणारी, ढगाशी ढगाचे घर्षण झाल्याने कडाडणारी आणि ढगामधून जमिनीवर कोसळणारी. ही तिसर्या प्रकारची वीजच अधिक नुकसानदायक ठरते. वीज उत्पन्न करणारे ढग सामान्यतः 10 ते 20 किलोमीटर उंचीवर असतात. त्यांचा आधार पृथ्वीपासून सुमारे एक ते दोन किलोमीटर उंचीवर असतो.

या ढगांच्या वरील भागाचे तापमान उणे 35 अंश सेल्सियस ते उणे 45 अंश सेल्सियस एवढे असते. म्हणजेच तापमान जेवढे वाढेल तेवढी वीज अधिक प्रमाणात तयार होईल आणि तेवढ्याच प्रमाणात ती जमिनीवर कोसळेल हे उघड आहे. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाला कसा आळा घालायचा आणि जलवायूमध्ये होत असलेले अनियंत्रित परिवर्तन कसे नियंत्रणात आणायचे हे संपूर्ण जगापुढील आव्हान आहे. परंतु हे परिवर्तन नियंत्रणात आले नाही तर सागरी वादळे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा भयावह घटना यापुढे दरवर्षी वाढतच जाणार आहेत, हे निश्चित.

- Advertisment -

ताज्या बातम्या