राज्यातील नाट्यगृहांना मिळणार नवी झळाळी

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

योग्य देखभाल दुरुस्ती अभावी दयनीय स्थितीत असलेल्या राज्यभरातील नाट्यगृहांना (theaters)लवकरच नवी झळाळी मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक नाट्यगृहावर चार कोटी ते १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन आरखडा तयार करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यातील नाट्यगृहांच्या समस्यांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत नाट्यगृहांचे आधुनिकीकरण आणि अद्यावतीकरण करताना राज्यातील सर्व नाट्यगृहांसाठी नमुना नकाशा तयार करण्याच्या सूचना मुनगंटीवार यांनी दिल्या.

सर्व नाट्यगृहांसाठी ‘टाईप प्लॅन’ तयार करताना आसन क्षमतेप्रमाणे नियोजन करण्यात यावे. साधारणपणे ४००, ६००, ८०० आणि ९०० आसन क्षमतेसाठी आवश्यकता असणाऱ्या बाबी अभ्यासण्यात याव्यात. साधारणपणे प्रत्येक नाट्यगृहांसाठी ४ कोटी ते १० कोटी रुपयांची आवयकता असून हा निधी कसा देता येईल याबाबतचा नियोजन आराखडा तयार करण्यात यावा. तसेच निधी वितरणाचे टप्पेही ठरवून घेण्यात यावेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्यात सध्या एकूण ८३ नाट्यगृहे आहेत. यापैकी खासगी २८ नाट्यगृहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित ५१ आणि राज्य शासनाची ४ नाट्यगृहे आहेत. या सर्व नाट्यगृहांचे पुढील १० वर्षांतील तंत्रज्ञानाचे बदल करताना आधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळेच या नाट्यगृहाचे नावीन्यपूर्ण नियोजन करुन काम करणे गरजेचे असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

या बैठकीला नाट्यनिर्माता दिलीप जाधव, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *