ना. थोरात यांच्या पाठपुराव्यातून नाट्यगृहासाठी 8 कोटी मंजूर – सौ. तांबे

jalgaon-digital
2 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणार्‍या कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या बंदिस्तकरण कामासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून आठ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांनी दिली.

सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या, नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराची विकासातून वैभवाकडे वाटचाल सुरू आहे. शहरात मोठ-मोठ्या वैभवशाली इमारतींसह अत्यंत सुंदर व भव्य दिव्य हायटेक बसस्थानक उभे राहिले आहे. याचबरोबर नव्याने शहराला जोडणार्‍या चारही रस्त्यांचे चौपदरीकरण व सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.

संगमनेर शहराचे सांस्कृतिक वैभव असणार्‍या कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे बंदिस्तीकरण कामासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून महाराष्ट्र सरकारकडून आठ कोटी रुपयांचा भरीव निधी मिळवला आहे. या निधीतून संपूर्ण नाट्यगृहाचे बंदीस्तीकरण होणार आहे. यामुळे शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, दर्जेदार नाटके यांसह चांगल्या कार्यक्रमाची शहरवासीय व तालुक्यातील नागरिकांसाठी वर्षभर मेजवानी मिळणार आहे.

नामदार थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शहरासाठी व तालुक्यासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. विकासातून संपूर्ण शहर हे राज्यात मॉडेल शहर ठरले आहे. नगरपरिषदेने नागरिकांना सातत्याने चांगल्या सुविधा देण्याबरोबर स्वच्छता, निळवंडे थेट पाईपलाईन योजनेतून मुबलक व भरपूर स्वच्छ पाणी, गार्डन, रस्ते, आरोग्याच्या मुलभूत सुविधा यांचेसह अनेक दर्जेदार सुविधा पुरवली आहे. यामुळे नगरपरिषदेचा सातत्याने राज्य व देश पातळीवर गौरव झाला आहे. नुकताच नगरपालिकेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला असून या सर्व प्रगतीमध्ये शहरातील नागरिक बंधू भगिनींचे मोठे सहकार्य मिळाले आहे.

नामदार थोरात यांनी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असणार्‍या कवी अनंत फंदी नाट्यगृहासाठी भरीव निधी मिळवल्याबद्दल संगमनेर शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नाट्यप्रेमी व कलाप्रेमींनी नामदार थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *