Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकहून निर्यातीचा टक्का वाढवणार

नाशिकहून निर्यातीचा टक्का वाढवणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पोषक वातावरणाचा लाभ उचलून नाशकातून निर्यातीचा टक्का वाढविण्यावर भर देण्याचा निर्धार अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)तर्फे जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच विविध औद्योगिक संघटना आणि बँकर्सतर्फे हॉटेल कोर्टयार्ड मध्ये आयात-निर्यात धोरणावर आयोजित चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, जीएसटीचे उपायुक्त जगदीश डोड्डी, स्टेट बँकेचे उपमहाव्यवस्थापक राजीव सौरव, बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी. बी. सिंग, पोस्ट कार्यालयाचे उपाधीक्षक प्रफुल्ल वाणी, महाराष्ट्र चेंबरचे कांतीलाल चोपडा, संजय सोनवणे,प्रमोद चौगुले, अविनाश मराठे, आशिष नायर, संग्राम साठे,विवेक सोनवणे आदी होते.

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारतर्फे आयात-निर्यात संदर्भात नवीन धोरण बनविण्याचे काम सुरू असून विविध क्षेत्रातील उद्योजकांना याबाबत काय अडीअडचणी येतात, त्यावर या चर्चासत्रात उहापोह झाला.जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला औद्योगिक क्षेत्र परिसरात शांतता प्रस्थापित करण्यास तसेच निर्यात वाढीसाठी आयमा आणि निमा या दोन्ही संस्था हातात हात घालून काम करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.महाराष्ट्रात निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. नाशकातून निर्यातीचा वेग चांगला आहे. निर्यातीच्या बाबतीत नाशिक राज्यात टॉप 5 मध्ये आहे. नाशिक लवकरच टॉप 3 मध्ये कसे येईल या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे, असेही ते पुढे म्हणाले.

महाराष्ट्र सरकारचे आयात-निर्यात विषयक धोरण ऑक्टोबरमध्ये जाहीर होणार आहे.त्याचा मसुदा तयार करतांना उद्योजकांना भेडसावणार्‍या विविध समस्यांचा तसेच सूचनांचा त्यात अंतर्भाव करण्यात येईल.त्याच अनुषंगाने आयमाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी निर्यात करताना येणार्‍या अडीअडचणी आणि निर्यातीबाबतची नाशिकची स्थिती याची तपशीलवार माहिती दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

प्रारंभी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी आयामाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांना निर्यात वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. आयमाने मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित निर्यात व्यवस्थापक घडवून त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. निर्यात वाढीसाठी शासनातर्फे नवीन धोरणासाठी मसुदा तयार करण्यात येत असून त्यात आयमाची मोलाची भूमिका राहणार आहे.त्यासाठीच्या अडीअडचणींचे निरसन करण्यास आयमातर्फे इम्पेक्स पॉलीक्लिनिक सुरु करण्यात आले आहे.

निर्यातवाढीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण आहे.कृषी क्षेत्रात नाशिक जिल्हा देशात अव्वल दहा मध्ये कसा येईल यादृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे.आवश्यकता वाटल्यास त्यासाठी कृषी सल्लागारांचाही सल्ला घ्यावा असे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सुचविले. सूत्रसंचालन प्रिया पांचाळ यांनी आपल्या खास शैलीत केले तर आभार आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी मानले.

याप्रसंगी आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे,सचिव योगिता आहेर,गोविंद झा,रवींद्र झोपे, राजेंद्र वडनेरे,मिलिंद राजपूत, जे.आर. वाघ, के.एस.सिंग, देवेंद्र विभुते, जयंत जोगळेकर, जयंत पगार योगेश दुसाने, तुषार थोरात, नवीन पांडे,आदित्य वाशीकर, मनीष रावल, कृष्णा बोडके,दिलीप वाघ,कृतिका महाजन,कर्णसिंग पाटील, सागर देवरे,कैलास पाटील,सचिन शाह आदी आयात निर्यात व्यवसायातील नामांकित उद्योजक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या