Friday, April 26, 2024
Homeब्लॉगशिक्षणाच्या प्रक्रियेत अभ्यासक्रमाचे महत्व

शिक्षणाच्या प्रक्रियेत अभ्यासक्रमाचे महत्व

परवा एका इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांसोबत गप्पा सुरू होत्या. नव्या शैक्षणिक धोरणाचा शालेय शिक्षणावर काय परिणाम होणार आहे यासंबंधी प्रश्न होते. पण धोरणात अभ्यासक्रमा संदर्भाने काय विचार केला आहे असाही प्रश्न होता. अभ्यासक्रमात होणारे बदल पाठयपुस्तकाच्या रूपाने समोर येत असल्यांने अभ्यासक्रम बदलाची नोंद घेण्याची फारशी गरज पडत नाही.

शिक्षक म्हणून आम्हाला पाठयपुस्तक महत्वाचे आहेत.अभ्यासक्रमाचे काय करायचे..? आजवर कधीच तो पाहिला नाही ,वाचला नाही, तरी पण गेले अनेक वर्ष मुलांना शिकवितो आहे अशी एक प्रतिक्रिया होती.खरतर ही प्रतिक्रिया प्रातिनिधिक होती.बहुतांश वेळा असचं घडत. शिक्षक सेवापूर्व प्रशिक्षणात अभ्यासक्रम आणि त्याचे महत्व याबाबत फारसे काही शिकायला मिळत नाही. त्याचे शिक्षणाच्या प्रक्रियेत महत्व काय ? त्याचे उपयोजन कसे करायचे ? हे देखील अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांच्या प्रतिक्रिया त्या स्वरूपाच्या येणार हे साहजिक आहे.

- Advertisement -

शिक्षकांच्या सेवापूर्व प्रशिक्षणाच्या निमित्ताने शाळा स्तरावरती जे जे काही घडते आहे.त्यांना ज्या विचाराने, दिशेने आणि धारणेने काम करणे अपेक्षित आहे. त्याबददल समग्र दृष्टीकोन निर्माण करण्याची निंतात गरज आहे. अनेकदा शिक्षक म्हणून केवळ पाठयपुस्तकाच्या मदतीने पाठ घ्यावे लागत असल्यांने केवळ अध्यापन पध्दती शिकविणे हाच सेवापूर्व प्रशिक्षणाचा गाभा राहातो. त्याच आधारे प्रात्यक्षिकांवरती भर आणि त्या दिशेचा प्रवास घडत राहातो. प्रत्यक्ष अभ्यासक्रम निर्मिती,पाठयक्रम,पाठयपुस्तक निर्मिती याबाबतचा प्रकाशझोत नसल्यांने भविष्यातील शिक्षकांसाठी केवळ वर्गात पाठयपुस्तक शिकविणे इतकेच महत्वाचे असते अशी धारणा पक्की होते. त्यात गेले काही वर्ष शिक्षक हक्क कायद्याच्या अमलबजावणी नंतर शाळा स्तरावर ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू झाली.शासन स्तरावरती दैनंदिन टाचन बदलले.त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी सातत्यपूर्ण सर्वकंष मूल्यमापन सूरू झाले आहे.मात्र या प्रक्रियेचा गाभा या प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक महत्वाचा असायला हवा मात्र तसे काही होतांना दिसत नाही.केवळ सैध्दांतिक दृष्टया या गोष्टी केल्या गेल्या तर प्रत्यक्ष काम करतांना त्याचा परिणाम दिसत नाही.त्याचा दुषपरिणाम शिक्षण प्रक्रियेवरती होतांना दिसतो.त्यामुळे शिक्षकांच्या चर्चेत आला मुददा महत्वाचा आहे हे दुर्लक्षित करता येत नाही.

शिक्षक प्रशिक्षणात अभ्यासक्रम,पाठयक्रम व पाठयपुस्तक या बददल थोडेफार बोलले जात असले तरी त्याकडे कसे पाहायचे असते ? त्यामागील विद्यार्थी विकासाची प्रक्रिया कशी असते ? त्याचा उपयोग पाठयपुस्तक शिकवितांना कसा करावा लागतो ? हे सहजतेने जाणून घ्यायला हवे असते.मात्र ती दृष्टी प्रशिक्षणातून पेरली जात नसल्यांने अभ्यासक्रम,पाठयक्रम हा केवळ शासन स्तरावरती केली जाणारी प्रक्रिया असते अशी धारणा बनत राहाते. त्या आधारे पाठयपुस्तके तयार होत असली तरी अभ्यासक्रमाची उददीष्टे साध्य करण्यासाठी अपेक्षित दृष्टी त्यातून निर्माण होत नाही.त्यामुळे अभ्यासक्रमाची उददीष्टे साध्य होतांना दिसत नाही हे वास्तव वर्तमानाने आता स्विकारले आहे. मुळतः अध्ययन अध्यापनाला दिशा देण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम,पाठयक्रम, त्यांची उददीष्टे यांचा विचार महत्वाचा ठरतो.त्या शिवाय आपण प्रभावी अध्यापनच करू शकत नाही.उददीष्टांची साध्यता करण्याच्या दृष्टीने अध्ययन अध्यापनासाठी लागणारे अध्ययन अनुभवाची रचना करता येणार नाही.मग या चिंतन व दृष्टीशिवाय आपण पाठयपुस्तक शिकवितो तेव्हा केवळ पाठयपुस्तकात असलेला आशय पोहचतो, पण त्यातून अपेक्षित असलेली मूल्य,गाभाघटक,जीवन कौशल्य आणि अध्ययन निष्पत्ती साध्य होत नाही. तसेच त्या सोबत इतर कौशल्यांचा एकात्म स्वरूपातील विचार अधोरेखित होत नाही.त्यामुळे शिक्षणांची अपेक्षित उददीष्टे साध्य करण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित महत्वाचा असतो.अभ्यासक्रमात समग्र दृष्टीकोन व्यक्त झालेला असतो. त्याचा विचार करीत शिकविणे सुरू झाले , तर शिक्षणातून अपेक्षित असलेल्या अनेक गोष्टी साध्य होऊन सहजपणे नजरेत भरतील.

अभ्यासक्रमाचा विचार मस्तकी नसला तर पुस्तक आणि त्यातील आशय, घटक महत्वाचे वाटतात. मात्र त्यामुळे योग्य प्रकारचे अध्ययन अनुभवाची रचना होत नाही .आता हेच पाहाना अलिकडे पाठयपुस्तकात देण्यात आलेली चित्रे केवळ पाहाण्यापुरती मर्यादित नाही.किंवा त्या आशयाला समर्पक ठरावीत एवढाच विचार त्यामागे नाही. त्यांचा उपयोग करीत विद्यार्थ्यामध्ये अभ्यासक्रमाची उददीष्टी आणि कौशल्य विकसित करण्याचा विचार करण्यात आलेला आहे.त्यासाठी चित्रवाचन,चित्रवर्णन,चित्रगप्पा अशा विविध कृतींचा विचार केला जातो. याकृती वर्गात घेण्यासाठी शिक्षकांने दिशादर्शक प्रश्नांचा आधार घेत विद्यार्थ्याकडून संवाद घडवून आणावा लागतो.ते प्रश्न नेमके कोणते असायला हवेत हे अभ्यासक्रम अभ्यासल्याशिवाय विचारता येणार नाही. उदाहरणार्थ पाठयपुस्तकात स्वयंपाकघराचे चित्र दिले आहे.त्यात बाबा स्वयंपाक घरात मदत करता आहेत.आई वर्तमानपत्र वाचते आहे.आजोबा ओसरीत बसले आहेत. अंगणात एक भाजीपाला विक्रेता आहे.असे चित्र ऱेखाटले आहे.या चित्राचे वाचन करतांना विद्यार्थी जे दिसते आहे ते सांगतील.वर्णन करतांना पात्र,त्यांची वेशभूषा,रंग,निसर्ग या बददल बोलतील.तर गप्पांमध्ये विद्यार्थी सृजनशीलतेने अंदाज बांधतील.त्या संदर्भाने बोलतील पण त्या करीता विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून अंदाज बांधण्यांची संधी देणे महत्वाचे आहे.त्या करीता अभ्यासक्रम आणि पाठयक्रमात श्रवण व भाषण कौशल्यांच्या संदर्भाने काही सूचविले आहे ,त्यात घरातील व परिसरातील चर्चा ,संवाद अपेक्षित आहे.मुळतः या कौशल्यासाठी पाठयपुस्तकात स्वतंत्रपणे अध्ययन अनुभवाची रचना करण्यात आलेली नाही.त्यामुळे या सारखे जे चित्र आस्तित्वात आहेत त्यांचा पुरेपुर वापर करीत श्रवण आणि भाषण कौशल्यांसाठी अध्ययन अनुभवाची रचना करणे शिक्षकांना शक्य होईल. अन्यथा ते पाठातील चित्र म्हणजे केवळ पाठाच्या आशयापुरते मर्यादित ठरेल. त्यामुळे या सारखे अपेक्षित क्षमता विकासाच्या संधीचे नियोजन करण्यासाठी या कृती महत्वाच्या आहेत.अन्यथा पाठयपुस्तक देखील वाचन व लेखन कौशल्यापुरते मर्यादित ठरण्याचा धोका असतो.अशा आशयात दडलेल्या पुरक गोष्टी या निमित्ताने शिक्षक म्हणून समोर आणल्या तर वर्गातील अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया गतीमान होण्यास मदत होणार आहे.त्या अर्थांने अनुभवातील विविधता विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे सहज शक्य असल्याचे जाणवेल.नाहीतर एका पाठाकरीता पंधरा वीस तासिका वार्षिक नियोजनात असतांना पाठ मात्र प्रत्यक्ष अध्यापनासाठी सुरू केल्यावर अवघ्या चारपाच तासिकेत तो पाठ संपत असेल , तर उर्वरित तासिकांमध्ये काय करायचे असा प्रश्न जो असतो त्याचे उत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विविध प्रकारच्या अनुभवाशी निगडीत असतो हे लक्षात घ्यायला हवे.त्या विविधेतून सर्व मुले शिकू शकतात.कारण प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या बुध्दीमत्तेचे आहे.त्यांची अभिरूची भिन्न आहे.आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक स्तर भिन्न आहे.त्यामुळे प्रत्येक तासिका आपण नव्या अनुभवाशी जोडून गुणवत्तेची पाऊलवाट चालू शकतो.

त्यामुळे धोरण,कायदा आस्तित्वात आल्यानंतर अभ्यासक्रम तयार होतो.त्या नंतर पाठयपुस्तक बदलाल.त्यातून केवळ पाठ,कविता बदलतात,इतर विषयांचे कमी अधिक घटक मागे पुढे होतात पण त्या पाठातून आपणाला काय पोहचवायचे आहे हे आपण जाणून घ्यायला हवे असते.त्यासाठी अभ्यासक्रमाची ओळख महत्वाची आहे.त्यांच्या उददीष्टांतून आपण विविध प्रकारे अनुभवाची पेरणी करून विद्यार्थ्यांचा उत्तम नागरिकत्वाच्या दिशेचा प्रवास घडवू शकतो. दुर्दैवाने अभ्यासक्रमाचा विचार वर्गातील शिकणे आणि शिकविण्याच्या प्रक्रियेत केला जात नसल्यांने आपण सारे पुस्तक केंद्रीत झालो आहोत.त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मोकळे आकाश मिळत नाही.पुस्तक केंद्रीत शिक्षणाने आपण स्वतःचे नुकसान करतो त्या प्रमाणे विद्यार्थी आणि समाजाचे देखील नुकसान करीत असतो.अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेऊन नियोजन केले तर शिकविणे अधिक आंनददायी होईलच , पण विद्यार्थ्यांसाठी शिकणे देखील अधिक परिणामकारक होण्यास मदत होईल.आपण पुस्तक केंद्रीत शिक्षणाला महत्व दिल्यांने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य मिळत नाही. त्याच बरोबर चौकटी बाहेरचा विचार करण्याची शक्ती विकसित करण्यावर देखील मर्यादा पडतात.व्यापक अर्थाने आपण अभ्यासक्रमाचा विचार करणे आणि पाठयक्रमाच्या आधारे शिक्षण सुरू ठेवणे गरजेचे आहे.त्या दिशेने प्रवास सुरू ठेवला तर भविष्यासाठी आपला प्रवास अधिक उज्वल होतांना पाहावयास मिळेल.शिक्षण हक्क कायदा देखील शिक्षकांची जबाबदारी निश्चित करतांना निर्धारित कालावधीत नेमून दिलेले पुस्तक पूर्ण करण्याची जबाबदारी सांगत नाही तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारीबददल बोलतो आहे.त्यामुळे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला एक पुस्तक पुरेसे नाही तर आपल्याला पाठयसंचाची गरज पडणार आहे.असे पाठयसंच निर्माण करण्याची जबाबदारी देखील शिक्षकांना पेलावी लागणार आहे.

_संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या