Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमहाकवी कालिदास दिन : मेघदूता पल्याडचा कालिदास

महाकवी कालिदास दिन : मेघदूता पल्याडचा कालिदास

जगभरात जेव्हा संस्कृत असा शब्द कुठे उच्चारला जातो तेव्हा सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ते एक नाव, ‘कालिदास’! संस्कृत साहित्य जगात पोहोचवताना झालेले समीकरण म्हणजे कालिदास (Kalidas) आहे…

केवळ भारतीय (Indian) नव्हे तर पाश्चात्य साहित्यातही (Western literature) महाकवी कालिदास हे नाव अभिनंदनीय ठरले आहे. मुळात त्याला भारतीय साहित्यातील (Indian literature) ‘शेक्सपिअर’ (Shakespeare) असे ओळखले जाते. आता खरे पाहता कालिदास आधीचा, त्यामुळे शेक्सपिअरला पाश्चिमात्त्य साहित्याचा ‘कालिदास’ म्हणणेही उचित ठरेल.

- Advertisement -

ग्रीष्मातील उष्मा सरला.. ढग दाटून आले की आपसूकच वातावरणातील होणारा तो बदल..सृष्टीला चढणारे नावीन्याचे रंग, सृजनाने खुललेले ते निसर्गाचे रुपडे आणि त्याला चिंब भिजवून टाकणारा आषाढ लागला की जणू हे संपूर्ण जग नव्याने जन्म घेतल्यासारखे भासू लागते.

केशवसुत त्यांच्या कवितेत म्हणतात की; ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका..’ इथे निसर्गही बहुधा तेच सुचवू पाहतोय, सगळं मळभ वाहून नेण्याचा प्रयत्न करत तो स्वतः तुम्हाला नवांकुरधारी करू पाहत आहे.

अशाच सकरात्मकतेने गजबजून निघणाऱ्या काळात ज्याची एक ओळख निसर्गकवि देखील आहे अशा महाकवी कालिदासाची आठवण जपणारा दिवस साजरा करणे हा मुळातच कविजनांचा बहुमान आहे.

किंबहुना ह्यालाच काव्यगत न्याय म्हणावे की काय असे वाटते. मातृत्व आणि कवित्व धारण करणे सगळ्यात कठीण असे म्हणतात ते काही खोटे नाही. कारण दोन्ही ठिकाणी मिळणारी पुनर्जन्माची अनुभूती ही अलौकिक असते.

आपल्यात रुजलेले आणि जीवपाड जपलेले ते बीज आपल्या नजरेसमोर ज्याक्षणी रांगु खेळू लागते त्या क्षणीचा तो आनंद हा अनन्यसाधारणच असतो. ‘महाकवि कालिदास’ हा एकूणच संस्कृत व समस्त साहित्य जगतातील कुतूहल आणि चर्चेचा विषय.

एका किंवदन्तीनुसार सुमार दर्जाची बुद्धिमत्ता लाभलेल्या एका ब्राह्मणाचा एका गर्विष्ठ पण विदुषी राजकन्येशी विवाह करविला जातो आणि तिने केलेल्या निर्भत्सनेतून कालिमातेचा उपासक आणि विद्वान कालिदासचा जन्म होतो.

अनेक विद्वानांनी कालिदासाच्या जीवनवृत्तान्ताचा शोध घेतला. आणि बाह्यान्तर्गत पुराव्यांनुसार हा काळ चंद्रगुप्त, विक्रमादित्य द्वितीय यांचा म्हणजे इ.स. ३८० ते ४१३ असावा असे मानले जाते. चंद्रगुप्त द्वितीय स्वतः विद्वान होता आणि कवींचा आश्रयदाता होता. कालिदास हा त्याचा सभाकवी व प्रिय सल्लागारही होता.

कालिदासाच्या काळात भारतवर्षाचे ‘सुवर्णयुग’ असावे असे मानले जाते. कारण खुद्द कालिदासाच्या काव्यात येणारे वैभवविलासाचे चित्रण त्याला पुष्टी देते. कालिदासाची शिवाप्रतीची निस्सीम भक्ती त्याच्या काव्यातून ओसंडून वाहताना दिसते. कारण मेघाला प्रिय पत्नीच्या विराहात निरोप घेऊन पाठवताना वाट वाकडी करत उज्जैनीच्या महाकालेश्वराचे दर्शन घेण्यास सांगणारा यक्ष याचे उत्तम उदाहरण ठरतो.

कालिदासाने संपूर्ण भारतभ्रमण केले असावे कारण त्याच्या काव्यातील बारीक वर्णने चक्षुदृष्ट भासतात. परंतु मेघाच्या नजरेतून दिसणारी नगरी, मार्ग हे त्याच्या असाधारण काव्यप्रतिभेचे लक्षण आहे. कालिदासचे नाव घेताच सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ते मेघदूत. परंतु त्याही पल्याड इतर साहित्यकृतींमधूनही त्याच्या प्रतिभेच्या पाऊलखुणा अगदी ठळकपणे उमटताना दिसतात.

कालिदास एक तत्त्वज्ञ होता, वेद, शास्त्र, पुराण, ज्योतिषाचा तर अभ्यासक होताच परंतु नाट्यशास्त्राचाही विचार त्याने त्याच्या तिन्ही नाटकातून बारकाईने केलेला दिसतो.

मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम् आणि अभिज्ञान-शाकुंतल. चढत्याक्रमाने कालिदासाने ह्या तीन नाट्यकृतीतून नाट्यमूल्यवर्धन केल्याचे लक्षात येते. तीनही नाटकांचा गाभा, त्याचे मूलतत्त्व ‘प्रेम’ आहे.

प्रेमाच्या प्रसंगानुरूप उमटणाऱ्या छटा, शृंगाराचे अयोग, संयोग आणि वियोगातील रसपूर्ण वर्णन, नाटकातील तंत्रानुसार अर्थ, प्रकृती,अवस्था, संधि आणि अर्थोपक्षेपकांची त्याने कौशल्याने योजना केलेली दिसते.

प्रसिद्ध कथावस्तू निवडून त्यांना नाट्यमयता आणण्यात कालिदासला तीनही नाटकात यश आलेले आहे. बऱ्याच ठिकाणी मूळ कथानकातील पात्र नाटकात तो अशा पद्धतीने रंगवतो की त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातील आदिपर्वात येणारा आणि अभिज्ञान-शाकुंतलातील राजा दुष्यंत. मानवी मनाच्या अंतरंगाला उलगडत त्यातील भाव उत्कटतेने मांडताना कालिदासाने काही अजरामर क्षण निर्माण केल्याचे दिसून येते. शाकुंतलातील ४ थ्या अंकातील श्लोक चतुष्टयातील कण्वमुनींची शकुंतलेच्या पाठवणीच्या वेळची मनोवस्था त्याचेच एक उदाहरण. कण्व ऋषि म्हणतात,

यास्यत्यद्य शकुन्तलेति हृदयं संस्पृष्टमुत्कण्ठय

कण्ठः स्तम्भितबाष्पवृत्तिकलुषश्चिन्ताजडं दर्शनम् ।

वैक्लव्यं मम तावदीदृशमिदं स्नेहादरण्यौकसः

पीड्यन्ते गृहिणः कथं नु तनयाविश्लेष दुःखैर्नवैः ॥

(अभिज्ञान-शाकुन्तल ४.६)

प्रिय कन्येच्या वियोगाने मन गलबलून आले आहे, अश्रु लपविताना कंठ दाटून आला आहे, चिंतेने दृष्टी निश्चेष्ट झाली आहे, माझ्यासारख्या अरण्यवासी मुनींना मानस कन्येच्या वियोगात इतके विलक्षणीय दुःख जाणवत आहे तर त्या गृहस्थाश्रमी पित्यांची अवस्था कल्पनेच्या पलिकडली आहे.

तसेच ९,१७ आणि १८ व्या श्लोकात ते प्रपंच प्रवाहात उतरू पाहणाऱ्या आपल्या मुलीला आदर्श शिकवण देताना दिसतात.ज्याला श्लोक चतुष्टय म्हटले गेले आहे. काळ बदलला तरी ह्या चारही श्लोकांचा संदर्भ आजही भारतीय जनमानसात किंबहुना प्रत्येकच पित्याच्या ठिकाणी ह्या प्रसंगी जसाच्या तसा दिसून येतो.

कालिदासाच्या नाटकात भाषा ही ओघवती, सरल आणि संक्षिप्त असल्याचे दिसून येते. संवादाचे तंत्र कालिदासाला गवसल्याने त्याच्या नाट्यकृती ह्या वेगळ्या ठरल्या. रसपरिपोषाच्या बाबतीत कालिदासाची प्रतिभा एक वेगळीच ऊंची गाठताना दिसते. तीनही नाटके शृंगार रस प्रधान आहेत.

मुळात शृंगार रस कालिदासाच्या विशेष आवडीचा रस त्यामुळे होणार रसोन्मेष अतिशय उत्कृष्ट ठरतो. मालविकाग्निमित्रम् मधील विवाहपूर्व अयोग व्याकूळता, विक्रमोर्वशीयातील संयोग शृंगारातील रमणीयता आणि शाकुंतलातील वियोग शृंगारातील कारुण्य आपल्या हृदयाला स्पर्श करुन जाते. ह्या व्यतिरिक्त इतरत्र येणारी वर्णने रसाची पुष्टी करणारे आहेत. तर प्रसंगी वीर, अद्भुत व हास्य रसही प्रयुक्त करण्यात आले आहेत.

कालिदासाच्या नाट्यकृती भारतीय जनमानसाच्या दृष्टिकोनातून असल्याने त्यातील घटनाक्रम,गृहीतके आणि अंत त्यानुसारच दिसून येतात. कालिदासाला ‘शेक्सपिअर’ म्हणताना आपल्याला काव्य प्रतिभेच्या उंचीत साधर्म्य दिसते.

परंतु दोन भिन्न संस्कृतींशी संलग्न असणाऱ्या ह्या दोन महान कवींची मानवी जीवनाचे पापुद्रे अलवारपणे उलगडत, देश-काळ-परिस्थिती आणि संदर्भित जनमानसाचा वेध घेऊन समाजाला पुढचे अनेक शतक आरसा दाखवण्याची लेखणीतील ताकद ही त्यांना व त्यांच्या नाटकांना अजरामर करणारी ठरली आहे.

इतर भाषांमध्ये लेखक,कवि,नाटककार होऊन गेले आहेत परंतु तरीही काही थोडकेच कवि जागतिक साहित्याच्या स्तंभावर आपले नाव कोरतात आणि पुढच्या अनेक पिढ्यांचा ते आदर्श ठरतात.

कवीच्या ठिकाणी एकदा कल्पनेचे गर्भधान झाले की त्यावर केले जाणारे संस्कार हे त्या कवीच्या कवित्वाची परीक्षा घेणारे असतात. त्या बीजाला जपून ह्या जगात आणायचे असते. त्याला इजा झाली तर त्याचे ह्या जगात जगणे अवघड होऊ शकते.

परंतु जसे जन्म घेईल तसे त्या बीजाला स्वतःच्या पायावर उभे करे पर्यंतच काय तो हक्क कविचा त्याच्यावर त्यानंतर प्रदीर्घ काळासाठी हे अपत्य जगराहाटीत एकदा सोडून दिले की त्याच्यावर खरा हक्क गाजवतात ते रसिक वाचक, प्रेक्षक.. कवि केवळ नाममात्र उरतो.. आणि खरेतर तो उरू नयेच.. कारण तरच नवा आषाढ अंगावर झेलून तो सुरुवात करू शकतो नव्या जन्माची…

रेणुका येवलेकर, संस्कृत व नाट्य अभ्यासक.

- Advertisment -

ताज्या बातम्या