Monday, April 29, 2024
Homeनंदुरबारठाणेपाडा जंगलात वणवा

ठाणेपाडा जंगलात वणवा

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा शिवारातील वनक्षेत्राला सोमवारी दि.१ फेब्रुवारी रोजी रात्री अचानक आग लागली. काल सायंकाळपर्यंत सुरु असणाऱ्या या आगीमुळे सुमारे २५० हेक्टर क्षेत्रातील जंगल जळून खाक झाले.

- Advertisement -

आग विझविण्यासाठी अग्निशमन दल ,वन कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. जंगलातील वन्यजीव बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार-साक्री रस्त्यावरील ठाणेपाडा गावालगत सुमारे ३०० ते ४०० हेक्टर क्षेत्रात राखीव वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रातून सुजलॉन कंपनीची व ३२ के.व्ही.ची मुख्य वीज वाहिनी गेली आहे.

सदरच्या जंगलात बांबू, खैर, साग आदी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. जंगलात बिबट्या, लांडगे, सारीण, सायाळ, काळवीट यासारख्या वन्यप्राण्यांसह शेकडो मोरांचे वास्तव्य आहे. दरम्यान, सोमवार दि. १ फेब्रुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक जंगलात आग लागल्याने दिसून आले.

ठाणेपाडा ग्रामस्थांनी तात्काळ जंगलात धाव घेतली. जंगलात आग लागल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविले.

ग्रामस्थांनी वन विभागाला कळविल्यानंतर वन अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र हवेच्या वेगामुळे आगीने रौद्ररुप धारण केले.

सुमारे १५ कि.मी.अंतरापर्यंत आगीचे लोळ दिसून येत होते. आग आटोक्यात आणणे दुरापास्त होते. अग्निशमन बंब बोलावूनही आग आटोक्यात येऊ शकली नाही.

यामुळे ठाणेपाडा येथील जि.प.सदस्य देवमन पवार व ग्रामस्थांनी धाडस करुन खोदकाम व गवत कापणीला सुरुवात केली. सुमारे २०० ते २५० ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. काल अखेर १८ तासानंतर आग विझली.

मात्र तोपर्यंत सुमारे २५० ते ३०० हेक्टर क्षेत्र खाक झाले. यामध्ये गेल्या १० वर्षापासून चराईबंदी व कुऱ्हाडबंदी केल्याने राखीव असलेले गवत व वृक्ष जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, जंगलातील वन्यजीव सुखरुप बचावल्याचे सांगण्यात येत आहे.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या