Thursday, April 25, 2024
Homeनगरशोकप्रस्ताव तयार करून ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी - गोंदकर

शोकप्रस्ताव तयार करून ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी – गोंदकर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या अविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही ठाकरे सरकारची (Thackeray Government) निव्वळ ढोंगबाजी आहे. एक हजार पन्नास कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला (Income Tax Department) सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकार (Thackeray Government) करत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर (BJP district president Rajendra Gondkar) यांनी पत्रकार परिषदेत केला.

- Advertisement -

भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री गोंदकर (BJP district president Rajendra Gondkar) सांगितले की, संकटात महाराष्ट्रातील शेतकरी व जनता त्रस्त असताना केवळ मदतीच्या कोरड्या आश्वासनांपलीकडे सरकारने काहीही दिलेले नाही. वादळात नुकसान झालेल्यांना सरकारने जाहीर केलेली मदतही अजून शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलेली नाही.

भाजपसोबत (BJP) सत्तेत असताना ऊठसूठ शेतकर्‍यांना बांधावर जाऊन हेक्टरी 50 हजारांची मदत करा, अशी तंबी देणारे ठाकरे आता तोंड लपवून बसले आहेत. शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहत आहे आणि ठाकरे सरकार (Thackeray Government) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) घटनांची काळजी दाखवत आहे. ही घटना दुर्दैवी आहे, पण महाराष्ट्रात रोज शेतकर्‍याचे मरण ओढवत असताना त्यावर मात्र ठाकरे सरकार चकार शब्द बोलत नाही. लखीमपूर घटनेवर राजकारण केले जाते. हा केवळ राजकीय स्टंट आहे. ज्यांच्या मेहेरबानीमुळे ठाकरे सरकार (Thackeray Government) अस्तित्वात आले, त्या सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) काँग्रेसची खुशामत करण्यासाठी राज्यातील संकटग्रस्तांना वेठीस धरू नका, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

राज्यातील सत्ताधारी नेते, सनदी अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराची हजारो कोटींची प्रकरणे बाहेर येत आहेत. आयकर खात्याने अधिकृतपणे हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. जनतेस तोंड दाखवायला जागा न राहिलेले अनेकजण चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी पळापळ करत आहेत आणि नवी प्रकरणे बाहेर येऊ लागल्याने अनेकजण धास्तावले आहेत. आपल्या भ्रष्टाचारावर आणि नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी लखीमपूर प्रकरण महाराष्ट्रात पेटवून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा सरकारचा डाव आहे.

राजकारण करून जनतेचे लक्ष समस्यांपासून दूर नेता येईल, पण त्यामुळे भ्रष्टाचार्‍यांवरील कारवाया थांबविता येणार नाहीत. दररोज नव्या भ्रष्टाचाराचे दाखले समोर येत असल्याने, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून ठाकरे सरकारची होणारी नोंद पुसता येणार नाही. अगोदरच करोना काळात कंबरडे मोडलेल्या महाराष्ट्रात बंद पुकारून जनतेच्या हलाखीत या राजकारणामुळे भर पडणार आहे, असेही श्री. गोंदकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या