Thursday, April 25, 2024
Homeधुळेप्रत्येक विक्रेत्याची रॅपिड अँटिजन चाचणी करा- जिल्हाधिकारी

प्रत्येक विक्रेत्याची रॅपिड अँटिजन चाचणी करा- जिल्हाधिकारी

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना विषाणूने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

- Advertisement -

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक विक्रेता, दुकानदार आणि दुकानातील कामगारांची रॅपिड अँटिजेन चाचणी करावी. ही चाचणी दर आठवड्याला करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. यादव बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे , डॉ. विक्रम बांदल , अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विजय जाधव, डॉ. विजय पाटील, उपायुक्त गणेश गिरी, डॉ. मधुकर पवार, डॉ. महेश मोरे, डॉ. शिवचंद्र सांगळे, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. महेश अहिरराव, डॉ. हेमंत भदाणे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करणे गरजेचे आहे.

त्यामुळे धुळे शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक फेरीवाला, भाजीपाला, दूध, फळविक्रेता, सर्व दुकानदार, दुकानातील कामगारांची रॅपिड अँटिजेन चाचणी मोहीमस्तरावर करावी. कन्टेन्मेन्ट झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शिरपूरमध्ये ऑक्सिजन युक्त 100 खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करावे असे त्यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता नसताना ऑक्सिजनयुक्त बेड अडविणार्‍या रुग्णांचा शोध घेवून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. कोविड केअर सेंटरमध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. तक्रार निवारण अधिकार्‍याचे नाव दर्शनी भागावर संपर्क क्रमांकासह प्रदर्शित करावे. याशिवाय कोविड केअर सेंटरच्या प्रभारी अधिकार्‍यांसह सर्व कर्मचार्‍यांनी उपस्थित राहावे. याबाबतचा पूर्तता अहवाल तातडीने सादर करावा. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये दर्शनी भागावर बिलाबाबत तक्रार असल्यास कोणाकडे संपर्क साधावा याविषयीचा फलक लावावा. त्याची पाहणी आपण स्वत: करणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले.

रेमडेसिव्हिर औषधांची जादा दराने विक्री करणार्‍यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करावी. औषधे जादा दराने विक्री होत असल्यास तातडीने कारवाई करावी. आरोग्य यंत्रणेने औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. त्यासाठी आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबतची खातरजमा जिल्हा शल्यचिकित्सकांनी करावी. पेरेजपूर, ता. साक्री येथील जवानाच्या मृत्यूप्रकरणी उपविभागीय अधिकारी, धुळे यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या