Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकबिबट्यांचा धुमाकूळ; शेतीकामे ठप्प

बिबट्यांचा धुमाकूळ; शेतीकामे ठप्प

शिंगवे। वार्ताहर Shingve

दुपारच्या वेळेत शेळ्या रानात चरत होत्या. अचानक शेजारील डाळिंबाच्या बागेतून बिबट्या (Leopard )वायू वेगाने झेपावला आणि डोळ्यादेखत कळपातील शेळी उचलली. मी खूप घाबरलो. पण, जीवाच्या आकांताने ओरडलो. माझा आवाज ऐकताच बिबट्याने शेळीला सोडून डाळिंबाच्या बागेत धूम ठोकली. शेळी ठार झाली.

- Advertisement -

डोळ्यादेखत घडलेला बिबट्याचा थरार सांगत होते म्हाळसाकोरे येथील शेळीपालक खंडू रामचंद्र जाधव. रविवारी (दि.5) त्यांच्या शेळीच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याने एक शेळी ठार झाली. त्यात त्यांचे आर्थिक नुकसान झाले. बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्यानंतरही बिबट्या बराच वेळ डाळिंबाच्या बागेत होता, असे प्रत्यक्षदर्शी शेतकरी सांगतात. नेहमीप्रमाणे वनविभागाने पंचनामा केला आणि घटनास्थळावर पिंजरा लावण्यात आला. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने जनावरे चारायची कुठे, असा प्रश्न पशुपालकांना सतावत असल्याचे खंडू जाधव यांनी सांगितले.

स्वतंत्र मोहीम राबवावी

एक बिबट्या मादी जेरबंद झाली असली तरी निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे परिसरात अजून बिबट्या व बछडे असल्याने दहशत कायम असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. वनविभागाने स्वतंत्र मोहीम राबवून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी गोदाकाठ परिसरातील नागरिक करत आहे.

चिमुकल्याचा घेतला बळी

29 जानेवारी 2023 रोजी म्हाळसाकोरे येथील दत्तू मुरकुटे यांच्या द्राक्षबागेत कामासाठी सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक येथील 15 मजूर आले होते. त्यांच्यातील हिरामण ठाकरे यांचा मुलगा रोहन हा बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडला आणि म्हाळसाकोरेसह गोदाकाठ परिसर हादरला. आई-वडिलांच्या डोळ्यादेखत हसता खेळता चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला. मुरकुटे वस्तीसह सगळीकडे हळहळ व्यक्त झाली.

वनविभागाने तत्परता दाखवत नाशिकहून आधुनिक बचाव पथक, ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, पिंजरे, वनविभागाच्या डझनभर अधिकार्‍यांसह स्थानिक युवकांनी बिबट्या जेरबंद करण्यासाठी रात्रीचा दिवस केला. अखेर तीन दिवसांनी 31 जानेवारी 2023 रोजी बिबट्या मादी जेरबंद झाली परंतु, बिबट्या जेरबंद झाल्याचा आनंद काही दिवसच टिकला.

बिबट्याच्या डरकाळ्यांनी आणि दर्शनाने म्हाळसाकोरे परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पांडुरंग चकोर यांचा पाळीव कुत्रा बिबट्याने ठार केला आहे.

स्वतंत्र कार्यालय गरजेचे

गोदाकाठ परिसरातील गावांमध्ये बिबट्याची दहशत असल्याने वनविभागाचे कार्यालय साठ किलोमीटरवर येवला येथे आहे. घटना घडल्यावर वनविभाग उशिरा पोहचतो. त्यामुळे लोकांचा मोठा रोष सहन करावा लागतो. शासनाने सायखेडा येथे वनविभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करावे. कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी.

अतुल कुटे, अध्यक्ष, सत्यमेव फाउंडेशन, सायखेडा

म्हाळसाकोरे परिसरात बिबट्याची दहशत इतकी आहे की आता रात्री कर्फ्यू लावल्यासारखी परिस्थिती तयार होते. शेतीकामे ठप्प झाली आहे. कांदे निंदणीची गरज आहे. परंतु, मजूरच शेतात काम करायला तयार होत नाही. बिबट्याच्या दहशतीने कांदा निंदणीचे काम खोळंबले आहे. पाणी असूनही पिकांना देता येत नाही.

दत्तू मुरकुटे, शेतकरी, म्हाळसाकोरे

- Advertisment -

ताज्या बातम्या