टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

टेम्पोने रस्त्याने पायी जाणार्‍या दोन महिलांना धडक देऊन समोरून आलेल्या दुचाकीलाही धडक दिली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसर्‍या महिलेसह दुचाकीवरील पती-पत्नी व त्यांचा मुलगा जखमी झाला आहे.

बुधवारी (दिनांक 24 मे) दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास नगर- जामखेड रोडवरील निंबोडी शिवारात हा अपघात झाला. या प्रकरणी जखमी सपना सुरज शेंडगे (वय 22 रा. लक्ष्मीनगर, निंबोडी) यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना दिलेल्या जबाबावरून टेम्पोवरील अनोळखी चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वत्सलाबाई भानुदास चांदणे (रा. निंबोडी) असे मयत महिलेचे नाव आहे. शकुंतला विजय चांदणे, फिर्यादी सपना शेंडगे, त्यांचे पती सुरज जगन्नाथ शेंडगे व मुलगा दक्ष सुरज शेंडगे हे जखमी झाले आहेत.

फिर्यादी सपना शेंडगे या त्यांच्या पती व मुलासह नगरकडून जामखेड रोडने निंबोडीकडे येत असताना हॉटेल जय मल्हार समोर जामखेडकडून नगरच्या दिशेने येणार्‍या टेम्पो चालकाने रस्त्याने पायी जाणार्‍या दोन महिलांना धडक दिली. त्यानंतर फिर्यादीच्या दुचाकीला धडक देऊन अपघात केला आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील वत्सलाबाई भानुदास चांदणे यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *