Wednesday, April 24, 2024
Homeनगरमंदिरे खुले करण्याच्या निर्णयाचे शिर्डीत जोरदार स्वागत

मंदिरे खुले करण्याच्या निर्णयाचे शिर्डीत जोरदार स्वागत

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

आंतरराष्ट्रीय देवस्थान शिर्डीचे साई मंदिर जवळपास 245 दिवसांपासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते.

- Advertisement -

अनेक दिवसांपासून साईंच्या दर्शनाची आस धरून बसलेल्या भाविकांसाठी राज्य शासनाने सोमवार दिनांक 16 नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घेतल्याने साईमंदिर खुले होत असल्याने शिर्डी ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.

करोना व्हायरसमुळे देशात तसेच राज्यात 22 मार्च 2020 पासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र संपूर्ण जगाला श्रद्धा सबुरीचा मंत्र देणार्‍या साईबाबांच्या शिर्डीतील साईमंदिर दि. 17 मार्च 2020 रोजीच बंद करण्यात आले होते. त्यानंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया तब्बल पाच ते सहा महिन्यांनंतर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली.

यादरम्यान राज्यात धार्मिक तीर्थस्थळे उघडण्यात यावी यासाठी भाजपच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व साईबाबा संस्थानला साई मंदिर खुले करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.

साईमंदिर खुले करण्यात यावे यासाठी जगभरातील लाखो साईभक्तांनी सोशल मीडियावर मागणी केली. मंदिरे बंद असताना देखील श्रद्धेपोटी साईभक्त शिर्डीत येऊन बाहेरुनच कळसाचे दर्शन घेत आपल्याला धन्य मानत होते.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष दत्ता कोते, तालुकाध्यक्ष राजेश लुटे, गणेश जाधव, विजय मोगले, लक्ष्मण कोतकर, सौरव हाडवळे आदींसह मनसे कार्यकर्त्यांनी मंदिरे खुली करण्यासाठी शिर्डीत आंदोलन केले. साईमंदिर बंद असल्याने शिर्डी शहरातील अर्थव्यवस्था पूर्णत: डबघाईला आली आहे. येथील व्यावसायिक मंदिरात येणार्‍या भाविकांवर अवलंबून असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

त्यामुळे बँकेचा कर्जाचा बोजा वाढतच गेला आहे. राज्य शासनाने मंदिरं उघडण्याचा निर्णय सोमवार दि. 16 रोजी घेतल्याने शहरातील नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. सोमवारी साईमंदिर उघडणार असून संस्थान प्रशासनाने भाविकांना दर्शनासाठी सोशल डिस्टन्सिंगसह अन्य व्यवस्था केली आहे. मात्र आता ऑनलाईन दर्शन पासेसच्या माध्यमातून भाविकांना दर्शनासाठी संधी मिळते की थेट दर्शन याबाबतचा निर्णय गुलदस्त्यातच आहे.

करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांचे शिर्डीतील साईमंदिर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असल्यामुळे शिर्डी शहरातील सर्व व्यवसाय बंद झाले. शहरातील लहान मोठा व्यवसायिक आर्थिकदृष्ट्या खचून गेल्याने साईमंदिर खुले करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देखील संस्थानला निवेदनाद्वारे मागणी केली होती. राज्य शासनाने मंदिर खुले करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने शिर्डीकरांचा आनंद द्विगुणित झाला असून शासनाचे आभार व्यक्त करतो. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी घटकांचे पालन करणे गरजेचे आहे.

– संदीप सोनवणे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस

- Advertisment -

ताज्या बातम्या