Friday, April 26, 2024
Homeनगरशिक्षक सोसायटीच्या सभेत यंदाही राडा

शिक्षक सोसायटीच्या सभेत यंदाही राडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची वार्षिक सभा रविवारी सत्ताधारी व विरोधकांनी घातलेल्या गोंधळाने गाजली. नेहमीप्रमाणे आरडाओरडा करत एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, हमरीतुमरी व धक्काबुक्की करणे, माईकची मोडतोड करणे, विरोधी संचालक व सभासद मते मांडताना गोंधळ घालणे, एकमेकांची लायकी काढणे, असे प्रकार घडल्यानंतर अखेर सत्ताधार्‍यांनी अखेर विषयांचे वाचन न करताच सभा गुंडाळून टाकली.

- Advertisement -

सभेत सत्ताधार्‍यांचे नेते भाऊसाहेब कचरे व विरोधी संचालक बाबासाहेब बोडखे व आप्पासाहेब शिंदे यांच्याशी आरोप-प्रत्यारोपाच्या कलगीतुरा अनेकदा रंगला. माध्यमिक शिक्षक सोसायटीची 79 वी वार्षिक सभा सोसायटीचे अध्यक्ष सुरेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वार्षिक सभा करोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे ऑनलाईन पद्धतीने झाली. रविवारी मात्र ऑफलाईन झाली. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक परस्परांवर तूटून पडले होते. कडाक्याच्या उन्हामुळे सभासद शिक्षकांची उपस्थिती मात्र फारच कमी होती. सभेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सभेत भाडेतत्त्वावर डाटा सेंटरची उभारणी, जागा खरेदी, नोकर भरती, मयत निधी, संस्थेचा कारभार ऑनलाइन झाला की नाही, मागील इतिवृत्तात सभासदांनी मांडलेल्या मुद्यांचा समावेश नसणे, सभा कायदेशीर की बेकायदा असे अनेक विषय गाजले. काही सभासद सभेत मद्य प्राशन करून आल्याचा संशय व्यक्त केला जात होता. डाटा सेंटर त्रयस्थ संस्थेच्या मदतीने भाडेतत्वावर उभारणीस बाबासाहेब बोडखे यांनी विरोध नोंदवला.

सभासद सुनील पंडित, मारूती भालेराव, आत्माराम दहिफळे, देवीदास पालवे, रमजान हवालदार, संजय फटांगरे, सुनील वाळुंज, भाऊसाहेब काळे, शितोळे, किशोर मुथा आदींनी चर्चेत सहभाग घेत, विविध सूचना केल्या. त्यास ज्येष्ठ संचालक कचरे यांनी समर्पक उत्तरे दिली.

ज्येष्ठ संचालक कचरे गेल्या अनेक वर्षांपासून सोसायटीचे नेतृत्व करत आहेत. विरोधकांच्या आक्षेप, आरोपांना सभेत अध्यक्षांऐवजी कचरेच उत्तरे देतात. सभासदांनी त्याला विरोध केला. कचरे 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांची ही अखेरचीच सभा होती. दरवर्षी जूनमध्ये होणारी सभा यंदा मे मध्येच घेण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. ‘त्यात काय बिघडले?’ असा प्रश्न करत कचरे आरोप टोलवून लावला. सभा सुरू होण्यापूर्वी विरोधी संचालकांनी प्रवेशद्वारावर कचरे यांचे व्यंगात्मक ‘कटआऊट’ लावून पुष्पहार अर्पण केले. त्यावर ‘मी निवृत्त होतोय, खर्च मात्र सभासदांचा’ अशी लिहलेले होते. कचरे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

सभेची सुरूवातच इतिवृत्त वाचनावरील गोंधळाने झाली. दीर्घकाळ चालणारे, कंटाळवाणे इतिवृत्त संपूर्ण वाचायचे की नाही यावर माध्यमिक शिक्षकांनी हमरीतुमरी सुरू केली. आमच्याबद्दल सभेत खडूस शेरेबाजी केली तर ती इतिवृत्तात कशी येईल, असा प्रश्न कचरे यांनी विरोधकांना केला. सत्ताधार्‍यांची समर्थक संचालक बोडके व शिंदे यांच्या भाषणात वारंवार व्यत्यय आणत होते. दोघेही संतप्त झाले होते. इतिवृत्त, सभा कायदेशीर की बेकायदेशीर यावरून कचरे व शिंदे यांच्यामध्ये तर डाटा सेंटर उभारणे, जागा खरेदी यावरून कचरे व बोडके यांच्यामध्ये दीर्घकाळ आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला. अखेर सभासदच त्याला वैतागले. कलगीतुरा हाणून पाडण्यासाठी काही सभासदांनी स्वतंत्र गोंधळ सुरू केला.

विरोधी संचालकांचा पावित्रा हाणून पाडण्यासाठी कचरे गटाने वार्षिक सभेत केवळ सभासदांनीच प्रश्न विचारावेत, विरोधी संचालकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी संचालक मंडळाच्या सभा आहेत, अशी भूमिका घेतली. अध्यक्ष मिसाळ यांनी तसे जाहीर केले. त्यामुळे विरोधी संचालकांवर अनेकदा गप्प राहण्याचा प्रसंग आला. सभासदांच्या प्रश्नावर उत्तर देताना अनेकदा बोडखे व शिंदे यांनी कचरे खोटी माहिती देत आहेत, सभासदांची दिशाभूल करत आहेत असा आक्षेप घेतला. संचालकांच्या वतीने शिंदे सभासदांना उत्तरे देतील असे सांगत कचरे यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चुकीचा कारभार तुम्ही करायच्या आणि आम्ही उत्तरे द्यायची का? असा टोला शिंदे यांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या