Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशिक्षण सेवकांच्या ६ हजार जागांसाठी भरती

शिक्षण सेवकांच्या ६ हजार जागांसाठी भरती

नाशिक | प्रतिनिधी

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित सुमारे सहा हजार पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्‌विटरद्वारे दिली आहे….

- Advertisement -

कराेना या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शासकीय पदभरतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र नुकत्याच झालेल्या बैठकीत पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेली शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया पदभरतीच्या बंदीतून वगळण्यात आली आहे.

त्यामुळे शिक्षक सेवक पदभरतीला हिरवा कंदिल मिळाला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थासह खासगी अनुदानित, अशंत: अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील जवळपास १२ हजार १४० शिक्षण सेवक/ शिक्षक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने ही पदभरती होत आहे. मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी पाच हजार ८२२ उमेदवारांची यापुर्वीच निवड करण्यात आली होती. आता उर्वरित जागांवरील भरतीसाठी ही प्रक्रिया सुरू होणार आहे.

प्रत्यक्ष पदभरतीची प्रक्रिया नव्या वर्षातच होणार सुरू

राज्य सरकारने नुकतीच शिक्षण सेवक पदभरतीला विशेष परवानगी दिली असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठीच्या अंतर्गत बाबींची पुर्तता करण्यासाठी किमान एक ते दिड महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पदभरतीला परवानगी मिळाली असली, तरी प्रत्यक्ष भरती प्रक्रियेसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शिक्षक भरतीची तपशीलवार माहिती :

– शिक्षक भरतीच्या एकूण जागा : १२, १४०

– संस्थांनुसार भरतीच्या जागा : स्थानिक स्वराज्य संस्था (७८८८), खासगी संस्था (४२५२)

– रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचा कालावधी : २२ फेब्रुवारी ते ८ मार्च

– मुलाखतीशिवाय पदभरतीच्या ९, १२९ जागा, त्यातील ५८२२ उमेदवारांची नियुक्तीसाठी जुलै २०१९ मध्ये निवड यादी जाहीर

- Advertisment -

ताज्या बातम्या