Friday, April 26, 2024
Homeनगरशिक्षकांच्या 50 लाखांच्या विमा कवचला मुदत वाढ द्या

शिक्षकांच्या 50 लाखांच्या विमा कवचला मुदत वाढ द्या

तिसगाव |वार्ताहर|Tisgav

करोनाची दुसरी लाट शहरापासून खेड्यापर्यंत झपाट्याने पोहचली आहे. वर्षभर आरोग्य कर्मचारी या साथीशी लढा देत होती. आता करोनाचा वाढता प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी शिक्षकांनाही या कामात सेवा वर्ग केले आहे. कोविड सेंटर, विलगीकरण कक्ष, चेक पोस्ट, माझे कुटुंब-माझी जबाबदारी अंतर्गत गाव सर्वेक्षण आदी कामासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

- Advertisement -

करोना सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांचे शासनाने लसीकरण केले आहे. मात्र, शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही. शासनाने मागीलवर्षी 50 लाखांचे विमा कवच लागू केले होते.त्याची मुदत डिसेंबरमध्ये संपली होती. आरोग्य कर्मचार्‍यांसाठी नव्याने अध्यादेश लागू तो लागू करण्यात आला असला तरी शिक्षक या विमा कवच्या प्रतिक्षेत आहेत.

याबाबत अधिक माहिती देतांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे लवांडे यांनी स्पष्ट केले की, शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणी कोणत्याही आरोग्य विषयक सुविधा व साहित्य पुरवले जात नाही. ते जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा म्हणून करोना योद्धे म्हणून सेवा देत आहेत. गेल्या काही दिवसात करोनाच्या विळाख्यात अनेक शिक्षक सापडले आहेत. यामुळे शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देवून विमा कवच लागू करण्याची मागणी होत आहे.

गेल्यावर्षी साथीच्या दरम्यान तीन महिने शिक्षकांना रेशन दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठेवले, यासह शिक्षकांनी अन्य सेवा दिलेल्या आहेत. त्यानंतर शाळेचे प्रवेश, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण ही कर्तव्य पार पाडली. दिवाळीनंतर पाचवीच्या पुढील वर्ग सुरु झाले. नियमित ऑनलाइन व ऑफलाइन अध्यापनाचे काम शिक्षकांनी केलेले आहे. आता करोनाची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत असतांना कर्मचारी संख्या अपुरी पडली आहे.

त्यामुळे पुन्हा शिक्षक हे शासनाचे दुर्लक्षित करोना योद्धे पुढे आले असतांना. त्याच्या आरोग्याविषयी शासन उदासीन का असा सवाल लवांडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच करोना संदर्भात सेवा देणार्‍या शिक्षकांना आरोग्य कर्मचार्‍यांप्रमाणे 50 लाखोचे विमा कवच मिळावे व करोना योद्धे म्हणून काम करणार्‍या शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याबाबत संघटनेनेच पत्रव्यव्हार केला असून त्यावर तातडीने निर्णय अपेक्षीत असल्याची मागणी लवांडे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या