Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकआश्रमशाळांमधील शिक्षकांना मिळणार ‘टॅब’; ६५ हजार विद्यार्थी, शिक्षकांना लाभ

आश्रमशाळांमधील शिक्षकांना मिळणार ‘टॅब’; ६५ हजार विद्यार्थी, शिक्षकांना लाभ

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

करोनाच्या पार्श्वभूमीवर इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सुरू असलेल्या सर्व आश्रमशाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सुमारे ६५ हजार विद्यार्थी आणि शिक्षकांना अद्ययावत टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

शाळा आणि आश्रमशाळांमध्ये मार्च-२०२० पासून ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. तथापि ग्रामीण भागातील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडे संगणक किंवा मोबाईल उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

इयत्ता ९ वी ते १२वी च्या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिक्षण देण्यासाठी टॅब खरेदी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार टॅब खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार दिक्षा सॉफ्टवेअर तसेच मराठी व सेमी इंग्लिश अभ्यासक्रम टाकण्यात येईल. बालभारती पाठ्यपुस्तकांनुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रम देण्यात येईल. अभ्यासक्रम ऑफलाइन व ऑनलाइन या दोन्ही स्वरूपात उपलब्ध असेल. जिल्हा पातळीवर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल.

टॅबलेटचा मालकी हक्क सरकारकडे राहील. टॅबलेट विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीकरिता आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्यात येतील. तथापि शैक्षणिक वर्ग संपल्यानंतर विद्यार्थ्यांने त्यांना उपलब्ध केलेले टॅबलेट आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करणे आवश्यक राहील. टॅबलेटच्या देखभालीची जबाबदारी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या