Thursday, April 25, 2024
Homeनगरआतापर्यंत 1 हजार 699 गुरूजींच्या बदल्या

आतापर्यंत 1 हजार 699 गुरूजींच्या बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आता अंतिम टप्प्यात आहेत. शेवटचा संवर्ग चारमधील पहिल्या टप्प्यातील 1 हजार 37 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत संवर्ग एक, दोन आणि तीन तर संवर्ग चारमधील पहिला टप्प्यात एकूण 1 हजार 699 शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. येत्या 15 दिवसांत संवर्ग चारमधील दुसरा आणि तिसरा टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्यावर बदलीची प्रक्रिया संपणार आहे.

- Advertisement -

कोविड संसर्गाचे दोन वर्षे आणि तिसरे वर्षे ऑनलाईन बदलीच्या प्रक्रियेत रखडल्यानंतर नोव्हेंबर 2022 पासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. आतापर्यंत संवर्ग एक ते तीन यातील बदली पात्र 662 गुरूजींची बदली झालेली आहे. संवर्ग चारमधील पहिल्या टप्प्यात एकल असणार्‍या 1 हजार 37 शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी झाली आहे. यामुळे आतापर्यंत बदली झालेल्या शिक्षकांची संख्या 1 हजार 699 झाली आहे.

गेल्या तीन वर्षापासून गुरूजी बदलीच्या प्रतिक्षेत होते. यंदाला शिक्षकांच्या बदल्यांना मुर्हूत लागला आहे. आता संवर्ग चारमधील टप्पा दोनमध्ये 42 शिक्षक विस्तापित अथवा प्रशासकीय बदली झालेली आहेत. बदलीसाठी 30 शाळांची नावे भरलेली एकही शाळा न मिळाल्याने हे 42 शिक्षक विस्तापित झालेले आहेत. आता या शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असून त्यानंतर टप्पा तीनमध्ये अवघड क्षेत्रात रिक्त असणार्‍या जागांवर शिक्षकांना बदलीचे आदेश देण्यात येणार आहे.

यानंतर गुरूजीच्या बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरवर्षी नियमित बदल्या झाल्यास साधारण 400 ते 550 शिक्षकांच्या बदल्या होत असे. तीन वर्षानंतर शिक्षकांच्या बदल्या झाल्याने यंदा आकडा मोठा दिसत आहे. दरम्यान, शिक्षकांच्या बदल्या झाल्याचे आदेश त्यांना मिळालेले असले तरी त्यांना बदलीच्या ठिकाणी कधी सोडणार याबाबत ग्रामविकास विभागाने कळवलेले नाही.

संवर्ग चारच्या पहिल्या टप्प्यातील बदल्या

अकोले 63, जामखेड 67, नगर 45, कर्जत 129, पारनेर 59, राहुरी 46, श्रीगोंदा 105, कोपरगाव 94, पाथर्डी 78, संगमनेर 69, श्रीरामपूर 43, नेवासा 95, राहाता 61 आणि शेवगाव 83 यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या