Friday, April 26, 2024
Homeनगरशिक्षक बँकेचे मतदान व नीट परीक्षा एकाच दिवशी

शिक्षक बँकेचे मतदान व नीट परीक्षा एकाच दिवशी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 17 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी नीट (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) परीक्षा होत आहे. यामुळे ज्या शिक्षक सभासदांची मुले-मुली नीट परीक्षेसाठी बसली आहेत, त्या शिक्षक सभासद पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण, परीक्षा केंद्र हे नाशिक, पुणे, औरंगाबाद ,अहमदनगर अशा मोठ्या शहरांमध्ये असल्याने शिक्षक पालकांना त्यांच्या मुला -मुलीला परीक्षेला घेऊन जावे लागणार आहे. यामुळे संबंधित शिक्षक सभासद मतदानापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा शिक्षक सभासदांची संख्या जवळपास 20 ते 25 टक्के आहे. सभासदांची मुले नीट परीक्षेस बसणार असल्यामुळे याचा फटका मतदान प्रक्रियेला बसणार आहे.

- Advertisement -

बुधवारी शिक्षक बँकेची संभाव्य निवडणूक तारीख जाहीर झाली आणि शिक्षक सभासद असणार्‍या पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे जिल्हा उपनिबंधक यांनी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणुकीची तारीख बदलावी, अशी शिक्षक पालकांची मागणी आहे. जर 17 जुलै रोजीच शिक्षक बँकेसाठी मतदान झाले तर जवळपास दोन ते अडीच हजार शिक्षक सभासद शिक्षक मतदानापासून वंचित राहणार आहेत. याची निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दखल घ्यावी. इतर जिल्ह्यातील शिक्षक बँकेच्या निवडणूक तारखा बदललेल्या आहेत. तसेच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीची तारीख बदलावी, अशी आग्रही मागणी शिक्षक सभासद यांनी केली आहे.

दरम्यान, जिल्हा उपनिबंधक यांच्याशी काहींनी संपर्क साधला असता, शिक्षकांनी तक्रारी आल्यास निवडणुकीची तारीख बदलण्याचा विचार करू, असे त्यांनी सांगितले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या