Thursday, May 9, 2024
Homeनगरकर थकबाकीदारांना न्यायालयाच्या नोटिसा

कर थकबाकीदारांना न्यायालयाच्या नोटिसा

सावळीविहीर |वार्ताहर| Savalivihir

सावळीविहीर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीचे कर थकबाकी न भरलेल्या ग्रामस्थांना राहाता न्यायालयाकडे मागणी करून न्यायालयाने कर भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा अशा नोटीस बजावल्याने ग्रामस्थांमध्येे घबराटीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

याबाबत अनेक वर्षांपासून घरपट्टी,पाणीपट्टी व इतर करांपोटी ग्रामपंचायतीची नागरिकांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल व्हावी म्हणून लोकअदालतमध्येे तडजोडीने वसुली व्हावी, यासाठी मागणी केली होती. त्यानुसार काल दि. 1 ऑगस्ट रोजी राहाता न्यायालयात लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयाने सुमारे 50 मिळकत थकबाकीदारांना पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, ग्रामपंचायतीने राहाता न्याय व विधी सेवा समितीकडे केलेल्या विनंतीवरून ज्या मिळकतधारकांची 31 मार्च अखेर असलेली थकबाकी तसेच 1 एप्रिलनंतर त्या रक्कमेवर 5 टक्के व्याज आकारले जाईल.

या महालोकअदालत तडजोड करून थकबाकी मिटवावी. सदर भरणा रोख अथवा चेक स्वरूपात जागेवरच स्विकारला जाईल, तसेच जे लोक अनुपस्थित राहतील किंवा भरणा करणार नाही त्यांचेवर पुढील कारवाई करून दावा दाखल करण्यात येईल. येताना ओळखपत्रासह जामीन घेऊन हजर रहावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. दरम्यान राहाता न्यायालयाच्या या नोटिशीमुळे अनेक नोटीसधारकांचे धाबे दणाणले असून ग्रामस्थांमधे तिव्र नाराजीचे वातारण आहे.

कारवाईशी ग्रामपंचायतीचा संबंध नाही- जपे

या नोटीस राहाता न्यायालयाने पाठविलेल्या आहेत आणि ही सर्व प्रक्रिया न्यायालयाची आहे यामध्ये सत्ताधारी सर्व सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी यापैकी ही नोटीस ही वैयक्तिक स्वरूपाची कोणत्याही ग्राहकास अगर ग्रामस्थ यांना पाठविलेली नाही आपण वैयक्तिक स्वरूपात सरपंच, उपसरपंच ग्रामविकास अधिकारी व आपल्या वॉर्डातील सदस्य यांना प्रत्यक्ष भेटून खुलासा करून घ्यावा आणि गैरसमज करून घेऊ नये, असे विद्यमान सदस्य बाळासाहेब जपे यांनी सांगितले.

तालुक्यात अनेक गावांत नोटीस – बीडीओ

नुसता एकट्या सावळीविहीरमध्ये अशी कारवाई केली नसून न्यायालयाच्या म्हणण्यानुसार वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येत आहे. राहाता तालुक्यात सर्व गावांना थकबाकीसाठी लोक अदालतची मदत घेतल्याचे राहाता तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले.

वसुलीसाठी मी पाऊल उचलले – खर्डे

अनेक वर्षांपासून काही ग्रामस्थांकडे मोठ्या प्रमाणात विविध करांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ते वसुलीस गेले असता कर्मचार्‍यांना अरेरावी केली जाते. वसूल झाला तरच गावच्या विकास कामांसाठी निधी खर्च करता येईल; परंतु काहींची पैसे भरण्याची मानसिकता नसल्याने हे पाऊल टाकल्याचे ग्रामविकास अधिकारी रावसाहेब खर्डे यांनी सांगितले.

ग्रा. पं. ने आमचेकडे मागणी केलीच नाही- पगारे

सावळीविहीर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी रावसाहेब खर्डे यांनी आमचेकडे वसुलीसाठी एकदाही मागणी केली नाही, तरी आम्हाला कोर्टात खेचले. आम्ही या प्रकरणाची चौकशी करुन वरिष्ठ स्तरावरून कारवाईची मागणी करणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. पगारे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या