ओबीसी आरक्षण बचावसाठी तालुकावार मोर्चे

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मराठा आरक्षणाला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पूर्ण पाठिंबा असून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावे अशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची भूमिका आहे.

ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तालुकावर मोर्चे काढून तहसिलदार यांना निवेदन देण्यात यावे असा निर्णय नाशिक येथे पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक जिल्हा व शहर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

कर्डक म्हणाले, आरक्षणाच्या प्रश्नावर निर्माण झालेल्या पेच प्रसंगाला सामोरे जात असताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची भूमिका स्पष्ट करण्याची गरत आहे. देशात ओबीसींची संख्या ५२ टक्के आहे. त्यामुळे ज्याची जेवढी संख्या तेवढं आरक्षण देण्याची गरज असतांना केवळ १९ टक्के आरक्षण देण्यात आलं आहे.

त्यातही प्रत्यक्षात ३४० जातींना आता १७ टक्के आरक्षण मिळत असून त्यात हा ५२ टक्के समाज बसविला जात आहे असे असतांना ओबीसीं आरक्षणातून मराठा आरक्षण देण्याची मागणी काही लोक करत आहे. प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत कुणाचाही दुजाभाव नाही. मराठा समाजाला त्यांच्या संख्येच्या तुलनेत आरक्षण देण्यात यावं मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये असे त्यानी यावेळी स्पष्ट केले.

जोपर्यंत ओबीसी जनगणना होणार नाही तोपर्यंत ओबीसींना आपल्या हक्काचे मिळणार नाही. यासाठी ओबीसीं बांधवाना एकत्र आणावे तसेच बहुजन समाजात मोठ्या भावाची भूमिका पार पडणार्‍या सर्व बांधवाना एकत्र करावे असे आवाहन बाळासाहेब कर्डक यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने काढण्यात येणारे मोर्चे हे मराठा आरक्षणाच्या विरोधात नसल्याची भूमिका प्रथमतः स्पष्ट केलेी. तर ३० नोव्हेंबरपुर्वी सर्व मोर्चे काढण्याचे आवाहन केले.

यावेळी नाशिक पूर्वचे संतोष डोमे, सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, माजी नगरसेविका वैशाली दाणी, पुरुषोत्तम कडलग, शंकर मोकळ, सुनील पैठणकर यांच्यासह तालुकाध्यक्ष व समता सैनिक उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *