Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारलाभार्थ्यांच्या उदासिनतेमुळे १५०० घरकुलांची कामे रखडली

लाभार्थ्यांच्या उदासिनतेमुळे १५०० घरकुलांची कामे रखडली

मोदलपाडा ता.तळोदा वार्ताहर nandurbar

पुरेसा निधी उपलब्ध असतांना देखील (Taloda taluka) तळोदा तालुक्यातील १५०० घरकुले सबंधित लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहेत. सदर लाभार्थ्यांनी तातडीने या घरकुलांची कामे हाती घेण्यासाठी (Panchayat Samiti Administration) पंचायत समिती प्रशासनाने ३० जूनच्या अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा हा निधी शासनाकडे परत पाठविण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत तळोदा तालुक्यात सन २०१७ मध्ये मंजूर करण्यात आलेली साधारण १५०० घरकुले पुरेसा निधी उपलब्ध असताना देखील सबंधित घरकुल लाभार्थ्यांच्या उदासीन धोरणामुळे आजतागायात अपूर्ण आहेत.

कुठे पायाचे, कुठे लींटल लेव्हलपर्यतच कामे लाभार्थ्यांनी केली आहेत. त्यांना घरकुलाच्या वेगवेगळ्या टप्प्यापर्यंतच्या कामाचे पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून मूल्यांकनानुसार निधीही वितरित करण्यात आला आहे.

असे असताना गेल्या पाच वर्षांपासून घरकुले रखडली आहेत. ही घरकुले लाभार्थ्यांनी तातडीने पूर्ण करण्याबाबत जिल्हा परिषदेने स्वतंत्र अधिकारी देखील नेमला होता.

हा अधिकारी आठवड्यातून किमान एकदा त्यांना नेमून दिलेल्या ग्राम पंचायतीत भेट देवून घरकुलाबाबत येणार्‍या लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेवून घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत होता. या उपरांतही घरकुले पूर्ण होत नसल्याने अशा लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या प्रशासनाने अनेक वेळा नोटिसादेखील बजावल्या आहेत.

तरीही उदासीन घरकुल लाभार्थी आपली अनेक वर्षापासून रखडलेली घरकुले पूर्ण करायला तयार नाहीत अशी तीव्र नाराजी प्रशासनाने बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता पुन्हा प्रशासनाने या लाभार्थ्यांना घरकुलाची कामे तातडीने हाती घेण्याबाबत या महिन्याच्या तीस तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला अन्यथा घरकुलाचा निधी परत पाठविण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आता तरी घरकुल लाभार्थ्यांनी आपल्यातील उदासीनता झटकून आपली घरे पूर्ण करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा

शासनाने घरकुलाच्या निधीत ठोस वाढ करावी. केंद्र शासनाचा प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेत सध्या दीड लाख अनुदान निर्धारीत केले आहे. यात सबंधित लाभार्थ्यांनी २७० स्क्वेअर फूट जागेवर बांधण्याचे निश्चित केले आहे. तथापि सध्या गगनाला भिडलेल्या महागाई मुळे एवढ्या तुटपुंज्या अनुदानात ते बांधणे लाभार्थ्यांना अशक्य होत असल्याची त्यांची व्यथा आहे. कारण सिमेंट, स्टील, वाळू, विटा यांचे भाव चार पट वाढले आहेत. त्याचबरोबर वाहतूक, मजुरीचे दरदेखील तिप्पट वाढले आहेत. शासनाच्या त्या अनुदानात घरकुल होणे मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

घरकुल पूर्ण करण्याबाबत प्रशासन तगादा लावत असले तरी लाभार्थ्यांपुढे पैशाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे लाभार्थी सांगतात. महिन्यागणिक महागाई वाढत असताना शासनाने ही महागाई लक्षात घेवून घरकुलाच्या अनुदानात घसघशीत अशी वाढ करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी शासन दखल घ्यायला तयार नाही. पैशाअभावी घरकुले अपूर्ण असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. घरकुलाच्या वाढीव अनुदानासाठी व घरकुल योजनेकरिता शासनाने निश्चित केलेले जाचक, अन्यायकारक नियम शिथील करावेत. कारण या नियमांमुळे बहुसंख्य लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत. निदान लोकप्रतिनिधींनी तरी आवाज उठवण्याची अपेक्षा लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

तळोदा तालुक्यात पाच वर्षांपुर्वीची मोठ्या प्रमाणात घरकुल अपूर्ण आहेत. अशा घरकुलांसाठी शासनाचा निधीदेखील उपलब्ध आहे.असे असताना लाभार्थ्यांनी आपले घरकुल पूर्ण करण्याबाबत उदासीन धोरण घेतले आहे. या लाभार्थ्यांनी उदासीनता झटकून या महिन्याअखेरपर्यंत तातडीने काम सुरू करावे.अन्यथा निधी शासनाकडे परत पाठवला जाईल.

– पी.पी.कोकणी,

गटविकास अधिकारी, तळोदा

- Advertisment -

ताज्या बातम्या