Thursday, April 25, 2024
Homeनाशिकतलाठी कार्यालयास ठोकले कुलूप

तलाठी कार्यालयास ठोकले कुलूप

मालेगाव | प्रतिनिधी | Malegoan

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे (Rain) शेतमालाची अतोनात हानी झाल्याने शेतकर्‍यांचे (Farmers) कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे महसूल यंत्रणेतर्फे केले गेले…

- Advertisement -

शासनातर्फे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान जाहीर करत दिलासा देण्याचे काम केले असले तरी महसूलच्या लालफितीच्या कारभारामुळे अनुदानापासून वंचित असलेल्या पिंपळगाव (Pimpalgaon), जळगाव (Jalgaon) येथील शेतकर्‍यांनी तलाठी कार्यालयास (Talathi Office) कुलूप ठोकत आपला संताप व्यक्त केला…

तालुक्यातील पिंपळगाव, जळगाव व परिसरात सन 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात हानी झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णत: संकटात सापडले होते.

उसनवार व कर्ज घेत उभे केलेले पीक अतिवृष्टीमुळे पूर्णत: वाया गेल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना शासनातर्फे फळबागांसाठी हेक्टरी 25 हजार तर इतर पिकांसाठी हेक्टरी 17 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेत दिलासा देण्यात आला होता. या नुकसानी पंचनामे महसूल विभागातर्फे (Revenue Department) करण्यात आले होते.

वर्ष उलटले तरी तालुक्यातील इतर गावांना अतिवृष्टीच्या नुकसानीचे अनुदान मिळत असताना पिंपळगाव, जळगावसह अनेक गावातील शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी तलाठी कार्यालयात वारंवार चकरा मारूनदेखील उपयोग होत नव्हता. त्यातच यावर्षी अद्यापपर्यंत चांगला पाऊस झाला नसल्याने पेरणी केलेली पिके पावसाअभावी होरपळत आहे. सन 2020 मध्ये अतिवृष्टीच्या पावसाने शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

पंचनामे होवूनदेखील अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना नुकसानीचे अनुदान मिळाले नसल्याने संतप्त शेतकर्‍यांनी पिंपळगाव येथील तलाठी कार्यालयास कुलूप ठोकत आंदोलन निषेध व्यक्त केला.

या आंदोलनात विजय पवार, रमेश पवार, माणिक पवार, कारभारी पवार, शिवाजी पवार, चिंतामण पवार, अजित पवार, बाळू पवार, चंद्रकांत पवार, बळीराम पवार, दीपक पवार, संजय पवार, सुरेश पवार, हिरालाल गेंद आदी नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. यानंतर तलाठी पिंजारी यांनी आपले निवेदन वरिष्ठ पातळीवर पोहचवले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर संतप्त शेतकर्‍यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

पिंपळगाव, जळगाव परिसरासह तालुक्यातील 20 ते 25 गावांतील शेतकरी गतवर्षाच्या अतीवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या अनुदानापासून वंचित आहे. अनेक गावांमध्ये अनुदान मिळत असतांना येथील शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. शासकीय दिरंगाईचा फटका शेतकर्‍यांनाच बसत आहे. अधिकारी दाद लागू देत नसल्याने कुलूप लावण्याचे आंदोलन हाती घेण्यात आले. या संदर्भात सर्व शेतकरी कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेवून लक्ष वेधणार आहे.

– अनिल पवार, उपसरपंच, पिंपळगाव दा.

- Advertisment -

ताज्या बातम्या