तलाठी परीक्षेत बनावट कागदपत्रे; 11 जणांविरूद्ध कोतवालीत गुन्हा

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापरीक्षा पोर्टलकडून राबविण्यात आलेल्या तलाठी भरतीमध्ये विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याची बाब जिल्हा निवड समितीच्या निदर्शनास आली आहे.

पडताळणीअंती एकूण 11 विद्यार्थी शंकास्पद असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यांच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420, 419, 417 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापरीक्षा पोर्टलकडून राबविण्यात आलेल्या तलाठी भरतीच्या प्रक्रियेत उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करताना संशयास्पद बाबी समोर आल्याने नगर जिल्हाधिकारी कार्यालयाने भरती प्रक्रिया स्थगित केली होती. त्यासोबतच संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. समितीमार्फत कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन पत्रासमवेत आपलोड केलेली स्वाक्षरी, परीक्षा केंद्रावर हजेरीपटावर केलेली स्वाक्षरी व कागदपत्र पडताळणीवेळी केलेली स्वाक्षरी यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे विचारक्षेत्रातील प्रारूप यादीमध्ये समाविष्ट होणार्‍या उमेदवारांपैकी उच्चतम गुणवत्ताधारक उमेदवारांचे महापरीक्षा पोर्टल यांचेकडून अभिलेख प्राप्त करून सदर अभिलेखांची पुन:श्च पडताळणी करण्यात आली. यामध्ये एकूण 11 उमेदवार शंकास्पद असल्याचे समितीच्या लक्षात आले. यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *