Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयटाकळीभान ग्रामपंचायत सदस्यांच्या शेवटच्या बैठकीचेही वाजले तीन तेरा

टाकळीभान ग्रामपंचायत सदस्यांच्या शेवटच्या बैठकीचेही वाजले तीन तेरा

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायत सदस्यांचा पंचवार्षिक कार्यकाळ येत्या 29 ऑगस्ट रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनापूर्वी काल झालेल्या सदस्यांची शेवटची बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते.

- Advertisement -

मात्र पदाधिकार्‍यांसह सदस्यांनीही रिमझिम पाऊस सुरू असल्याचे कारण देत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुपारी तीन वाजता संवाद साधून एकत्रित बैठकीकडे पाठ फिरवल्याने सदस्य मंडळाच्या कार्यकाळात होणार्‍या या शेवटच्या बैठकीचेही तीन तेरा वाजले आहेत.

15 ऑगस्टपूर्वी काल होणारी सदस्यांची ही बैठक पाच वर्षातील शेवटचीच बैठक होती. वास्तविक 13 ऑगस्टला बैठक बोलावण्यात आली होती. मात्र सदस्यांच्या उदासिनतेमुळे ती पुढे ढकलून काल 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आली होती. मात्र 11 वाजता सदस्यच उपस्थित न राहिल्याने व पाच वर्षांतील शेवटची बैठक असल्याने पावसाचे कारण देत दुपारी 2 वाजता व्हीडीओ कान्फरन्सिंग द्वारे बैठक घेण्यात आली.

या चर्चेत वर्क फ्रॉम होम करीत असलेले ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव, सरपंच रुपाली धुमाळ, सदस्य भारत भवार, कान्होबा खंडागळे, अविनाश लोखंडे, सविता बनकर, सविता रणनवरे आदी सदस्य व्हीडीओ कान्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते.

झेंडावंदन, अतिक्रमण, गणेशखिंड रस्ता दुरुस्ती आदी विषयांवर सुमारे एक तास चर्चा झाली. वास्तविक पंचवार्षिक कालावधीतील ही शेवटची बैठक असल्याने ग्रामसचिवालयाच्या सभागृहातच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत सर्व 17 सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणे गरजेचे होते.

शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य असूनही पावसाचे कारण पुढे करून सदस्यांनी बैठकीला जाण्यास टाळाटाळ केली. मात्र पाच वर्षातही एकमत न झालेल्या सदस्यांचे शेवटच्या बैठकीतही एकमत न झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पाच वर्षातील बैठकांप्रमाणेच शेवटच्या बैठकीचेही तीन तेराच वाजले.

ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना स्थगिती

टाकळीभान |वार्ताहर|Takalibhan

ग्रामसभा हे नागरिकांना आपल्या मागण्या व ग्रामपंचायत प्रशासनाबाबत तक्रारी मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ असले तरी करोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामसभांना होणारी गर्दी व करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुढील आदेश येईपर्यंत ग्रामसभा घेण्याला स्थगिती दिली आहे. याबाबतचा शासन आदेश नुकताच काढण्यात आला आहे.

ग्रामसभा हे ग्रामपातळीवर मागण्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ आहे. अनेक विकास कामांचे ठराव ग्रामसभेतूनच करण्याची ग्रामपंचायत अधिनियमात तरतूद आहे. ग्रामसभेने मंजूर केलेल्या ठरावाला कायदेशीर मोठे महत्त्व आहे. मात्र राज्यात करोनाचा फैलाव वाढता असल्याने वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ग्रामसभा स्थगित करण्याचा आदेश काढला आहे.

राज्यातील कोव्हिड 19 च्या संसर्गजन्य आजारामुळे असणारी आपत्कालीन स्थिती लक्षात घेता ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांची असणारी उपस्थिती व त्यामुळे होणारी गर्दी ही आजाराच्या प्रादुर्भावाच्यादृष्टीने योग्य नाही. सद्य स्थितीत ग्रामसभा घेतल्यास या आजाराचा जास्त फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच केंद्र व राज्याचे हे आदेश आशा प्रकारच्या सभा घेण्यास प्रतिबंध करतात. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या मुंबई आधिनियम क्र. 3 च्या कलम 7 नुसार ग्रामसभा घेण्यास पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगिती देत आहे, असे महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवांनी नुकत्याच काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार वर्षातून किमान 4 ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे. मात्र करोना संसर्गाच्या प्रादुर्भावाने आता 15 ऑगष्ट रोजी होणार्‍या ग्रामसभेला स्थगिती मिळाल्याने विकासाच्या मुद्यावर चर्चा करणार्‍या ग्रामस्थांच्या हक्काच्या व्यासपिठावरही गदा आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या