Friday, April 26, 2024
Homeनगरटाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची मांदीयाळी

टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची मांदीयाळी

टाकळीभान वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील तालुक्याच्या राजकारणावर दबदबा असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे.

- Advertisement -

मोठ्या कुटुंबातील इच्छुक एकमेकासमोर निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसत असल्याने कुटुंबात उभी फूट पडणार असल्याने गावपुढारीही त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष वेधवणारी आहे. दर पाच वर्षाला मोठा गाजावाजा करीत ही निवडणूक लक्षवेधी ठरल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे तालुक्याचे नेतेही या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष ठेवून आसतात.

त्यामुळे गेली 20 वर्षे दिवंगत माजी आमदार जयंतराव ससाणे यांनी या ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवलेले आहे. ससाणे यांच्या निधनानंतर बरेच पाणी पुलाखालून गेल्याने स्थानिक गावपुढारी बाये मुड दहीने मुड झालेले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांची मांदियाळी होताना दिसत आहे.

येत्या 15 जानेवारी रोजी होणारी निवडणूक चांगलाच रंग भरु लागली आहे. या निवडणुकीत अनेक नवखे तरुण उमेदवारीच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे गावपुढार्‍यांच्या कार्यालयात इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे. गावपुढारीही उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. गावातील मतदार संख्येने मोठ्या असलेल्या पटारे, पवार, मगर, कोकणे, दाभाडे, रणनवरे, बोडखे कुटुंबातही इच्छुक वाढलेले आहेत.

त्यामुळे निवडणूक लढवणार्‍या दोन्ही गटांकडून आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून या मोठ्या कुटुंबातील तरुण प्रयत्न करीत आहेत तर गावपुढारी लढत रंगतदार व्हावी म्हणून या कुटुंबातील तोलामोलाचा उमेदवार पुढे करीत आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील चुलते- पुतणे, भाऊ-भाऊ, जावा-जावा, चुलत भाऊ, चुलत-जावा यांना उमेदवारीसाठी गावपुढारी गळ घालत आहेत.

आजपर्यंत कुटुंबात एकोप्याने नांदणार्‍या कुटुंबामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने दरी पडणार आहे. मात्र नात्यापेक्षा ग्रामपंचायत सदस्य होण्यात स्वारस्य असलेले तरुण नात्यागोत्याला विसरून आपल्याच माणसाच्या विरोधात दंड थोपटताना दिसू लागले आहेत. याचाच अर्थ नातेसंबंधापेक्षा राजकारण प्रभावी झाले आहे. राजकारणात मुरलेले गावपुढारीही सत्तेचा सोपान गाठण्यासाठी कुटुंब दुभंगताना दिसत आहे.

एकूणच ग्रामपंचायत निवडणुकीमुळे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने इच्छुकांमध्ये चढाओढ होताना दिसत आहे. गावपुढारीही या संधीचा फायदा घेत कुटुंबाकुटुंबातच तिकीट वाटप करून गावगाड्याची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करीत असल्याने मतदार संख्येने मोठ्या असलेल्या कुटुंबातच निवडणुकीचा आखाडा होण्याचे चित्र आज तरी दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या