Friday, April 26, 2024
Homeनगरटाकळीभान ग्रामपंचायत प्रशासनाला माजी सरपंच यांचा फोटो लावण्याचा पडला विसर

टाकळीभान ग्रामपंचायत प्रशासनाला माजी सरपंच यांचा फोटो लावण्याचा पडला विसर

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान ग्रामपंचायतीने 20 वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयात माजी सरपंचाचा फोटो लावण्याची परंपरा सुरु केली आहे. मात्र विद्यमान सदस्य मंडळाला कारभार हाती घेवुन एक वर्षापेक्षा जादा कालावधी झाला असला तरी गेल्या पंचवार्षिक कालावधीत पाच वर्षे सरपंच राहिलेल्या महिला सरपंच रुपाली धुमाळ यांचा फोटो कार्यालयात लावण्याचा विसर पडलेला दिसत आहे.

- Advertisement -

टाकळीभान ग्रामपंचायतीची स्थापना 7 एप्रिल 1952 साली झाली असून या 68 वर्षात 13 सरपंचांनी गावाच्या विकासात योगदान दिले आहे. यापैकी काहींचा कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त तर काहींचा वर्षभराचा राहिलेला आहे. यातील बहुतांश सरपंच आपल्या कामाचा ठसा उमटवुन दिवंगत झालेले आहेत. तर काही आजही ग्रामविकासात मार्गदर्शन करीत आहेत. वीस वर्षापुर्वी सरपंच चित्रसेन रणनवरे यांच्या कार्यकाळात आजपर्यंत गावाच्या विकास कामात योगदान देणार्‍या सरपंचांची माहिती पुढच्या पिढीला मिळावी व त्यांच्या ऋणातून उतराई होता यावे या हेतूने सर्व माजी सरपंचांचे फोटो ग्रामपंचायत कार्यालयात लावण्याचा ठराव झाला होता. त्यानुसार 1952 साली झालेल्या सरपंचापासून ते त्यांच्या कालावधीपर्यंतच्या सर्व सरपंचांचे फोटो त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात लावले आहेत. त्यानंतर झालेल्या सरपंचांनीही ही प्रथा पुढे सुरु ठेवली आहे.

गेल्या पंचवार्षिक 2015 ते 2020 या कालावधीत महिला सरपंच म्हणून रुपाली रणजित धुमाळ यांनी आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी जानेवारी 2021 ला ग्रामपंचायतीत नवीन सदस्य मंडळ निवडून आले आहे. या सदस्य मंडळातही महिला सरपंच विराजमान झालेल्या आहेत. सुमारे वर्षभरापेक्षा जास्त कालावधी उलटला असला तरी महिला माजी सरपंच रुपाली धुमाळ यांचा फोटो कार्यालयात लावण्याचा विसर विद्यमान पदाधिकारी व सदस्य मंडळाला पडला आहे. सदस्य मंडळाला खरोखर विसर पडला की फोटो लावण्यातही राजकारण केले जात आहे हे पुढील काळात दिसून येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या