Wednesday, April 24, 2024
Homeनगरतहसीलच्या आवारातून तांदूळाची गाडी बेपत्ता

तहसीलच्या आवारातून तांदूळाची गाडी बेपत्ता

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या जवळ एक अशोक लेलँड कंपनीची मालवाहतूक गाडीत असलेला तांदूळ हा रेशनचा असून

- Advertisement -

त्या तांदळाची अवैध विक्री होत असल्याच्या संशयातून सदर गाडी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी पकडून चालकासह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेऊन लावली. मात्र दोन ते तीन तासांनंतर सदर तांदूळाच्या गोण्यांनी भरलेली गाडी व चालक तहसील आवारातून गायब झाला असून आज दोन दिवस झाले तरी याबाबत कुठलीही तक्रार दाखल न झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

तो तांदूळ काळ्याबाजारातच चालला होता का? तांदूळ कोणाचा होता? गेला कुठे? त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत असून याबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे.

मंगळवार दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ चारचाकी अशोक लेलन कंपनीच्या गाडी क्रमांक एम एच 17 बी वाय 6001 या चारचाकी वाहनातून तांदळाने भरलेल्या गोण्याची वाहतूक होत असताना हा तांदूळ रेशनचा असून त्याची अवैधपणे विक्री होत

असल्याच्या संशयातून मनसे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड आदींनी ही तांदळाची गाडी अडवून त्यांनी पुरवठा अधिकार्‍यांना ही बाब सांगितली. त्यांनी पाहणी करून त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. त्यानंतर मनसे सैनिकांनी ही गाडी चालकासह तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात लावली.

याबाबत तहसीलदार यांच्याशी फोनवर बोलून हकीकत सांगितली. तहसीलदार योगेश चंद्रे हे मिटिंगमध्ये असल्या कारणाने त्यांना येण्यास विलंब झाला. त्यामुळे मनसे कार्यकर्ते वेळ अधिक झाल्यामुळे तेथील कर्मचार्‍यांना सांगून तेथून निघून गेले.

मिटिंग संपल्यावर तहसीलदारांनी याबाबत मनसे कार्यकर्त्यांना फोन करून बोलावून घेतले व त्यांच्याशी चर्चा केली मात्र तो पर्यंत सदर तांदूळ गोण्या भरलेली गाडीही तेथून पळविण्यात आली होती. ही बाब लक्षात येताच तहसीलदार व मनसे पदाधिकार्‍यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यात सदर गाडीचालक व अन्य 2 इसम त्यासोबत हालचाल करताना आढळून आले.

त्या चालकाने गाडी घेऊन धूम ठोकल्याचे पहावयास मिळाले. हा सर्व प्रकार मंगळवारी दिवसभर घडला मात्र आता या गदारोळानंतर 2 दिवस उलटत आले तरी गुन्हा दाखल झाला नव्हता. याप्रकरणी आता तरी गुन्हा दाखल होणार का ? हा तांदूळ रेशनचा असेल तर या दिवसाढवळ्या होणार्‍या काळ्याबाजाराला डोळ्यावर पट्टी बांधून अभय दिले जाणार का ? असे एक ना अनेक प्रश्न तालुक्यातील जनतेला पडले आहे.यासंबंधी तहसीलदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या