Wednesday, April 24, 2024
Homeनगरतबल्यावर वाजला अनोखा बनारसी कायदा रेला व ठेका

तबल्यावर वाजला अनोखा बनारसी कायदा रेला व ठेका

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तबला वादनाच्या परंपरेत कदाचित हे पहिल्यांदाच महाराष्ट्रातील एक शिष्य व त्यांचे शिष्य-परंपरा काशी येथील बनारस या ठिकाणी जाऊन आपल्या गुरुगृही ‘तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा..’ हा समर्पणाचा भाव प्रगट करत तालगंगेच्या नादरुपी जलात बनारस भूषण जगविख्यात प्रसिद्ध तबलावादक पंडित शारदा सहायजी यांच्या महान गुरुपरंपरेला अभिषेक करत एक नवीन परंपरा सुरू केली.

- Advertisement -

तब्बल 40 तबल्यावर एक साथ ना-धिं-धिं-नापासून कायदा, रेला, विविध बनारसी ठेके यांचे सादरीकरण करून स्वामीनारायण मंदिर परिसर गुरु शिष्य परंपरेच्या सुखद अनुभवात धन्य धन्य झाला.

महाराष्ट्रातील लातूर येथील सरस्वती संगीत विद्यालयाचे सर्वेसर्वा अध्यक्ष बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबला वादक तालमणी डॉ. राम बोरगावकर, त्यांचे सुपुत्र गणेश बोरगावकर, त्यांचे शिष्य तबला अलंकार अनिल डोळे व त्यांच्या चाळीस शिष्यांनी वाराणसी नगरीतील स्वामीनारायण मंदिरात तालगंगेच्या साधनेचा आरंभ करून इतिहास रचला.

सलग तीन दिवस चाललेले हे तबला वादनाचे शिबीर हे नक्कीच इतिहासातील प्रथम मानकरी असल्याचा बहुमान मिळवत बनारस घराण्याच्या गुरुपरंपरेला अभिवादन करत आपली ताल साधना सादर केली. या शिबिरात दोन्हीही गुरुशिष्याच्या जोडीने तसेच त्यांच्या शिष्यांनी बनारस वादनशैली, बोलाचा निकास, कायदे, रेले, ठेके याबद्दल मार्गदर्शन घेतले. ना-धिं-धिं-नाचे जादूगार पं. अनोखेलाल यांच्या ‘खडी उंगली का तीनताल’ तसेच पद्मविभूषण पंडित किशन महाराज यांचा खास बनारसी ठेका याचेही मार्गदर्शन घेत कायदा व बोलांच्या रचनेतील बारकावे यांचा अभ्यास केला. हे केवळ बोल नसून तबल्याचे तालमंत्र आहेत, असे डॉ. राम बोरगावकर यांनी सांगितले.

सदर शिबिरात बनारस येथील प्रसिद्ध कलावंत पं. शारदा सहाय यांचे नातू पं. ओम सहाय यांचे सारंगी वादन झाले तसेच पूजा रॉय यांचे गायन झाले. त्यांना तबल्यावर पं. आनंद मिश्रा यांनी साथ केली. दुसर्‍या दिवशीच्या शिबिराच्या संगीत तालगंगेत प्रा. सतिश सुलाखे यांचे गायन झाले. त्यांना तबल्याची साथ अनिल डोळे यांनी केली तर शिर्डीचे प्रसिद्ध गायक संकेत दरकदार यांचे गायन झाले. त्यांना तबला साथ नकुल भगत यांनी केली. सिध्दार्थ थत्ते, आदित्य मराठे, दिनेश डोळे, विश्वनाथ बेहरे व ईशान डोळे यांच्या सहवादनाने शिबिराचा समारोप झाला.

बाभळेश्वर (ता. राहाता) येथील सद्गुरु नारायणगिरी गुरुकुलाचे नवनाथ महाराज म्हस्के, भगवान महाराज डमाळे व बाबा वाघ यांच्या सर्व टीमचे बहुमोल सहकार्य लाभले. शिबिरासाठी अहमदनगर, श्रीरामपूर, औरंगाबाद, बीड, संगमनेर, शिर्डी, अकोला, जालना, श्रीगोंदा, कर्जत अशा विविध ठिकाणाहून अनेक लहान मुले, महिला शिष्य, त्यांचे पालक व संगीतप्रेमी उपस्थित होते.

श्रीरापुरातील अवधूत कुलकर्णी, सिध्दार्थ थत्ते, गणेश बेहरे, दादा शिंदे, मंगेश कचरे या सिनियर शिष्य मंडळीं समवेत प्रा. सौ. व श्री. सतीश सुलाखे, सुनील अपसिंगेकर, सौ. उषा गाडेकर आदींसह पालकांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या