Friday, April 26, 2024
Homeजळगावदूध संघात रंगले ताबानाट्य

दूध संघात रंगले ताबानाट्य

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघात (Jalgaon District Milk Producers Association) ताबा कोणाचा या विषयावरुन आता राजकीय आखाडा (political arena) रंगू लागला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास दूध उत्पादक संघाच्या कार्यालयात चेअरमन मंदाताई खडसे (Chairman Mandatai Khadse) आणि मुख्य प्रशासक आमदार मंगेश चव्हाण (Chief Administrator MLA Mangesh Chavan) या दोघांचे संचालक मंडळ दिसून आले. दरम्यान, न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत दूध संघाची मीच चेअरमन आहे असा दावा मंदाताई खडसे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केला. तर दुसरीकडे शासनाने संचालक मंडळ बरखास्त (Dismissal of the Board of Directors) केले असून, मुख्य प्रशासक (Chief Administrator) म्हणून माझीच नियुक्ती वैध असल्याचा दावा भाजपाचे मंगेश चव्हाण यांनी केला आहे.

- Advertisement -

जिल्हा दूध संघात मोठ्या प्रमाणावर गैर व्यवहार असल्याच्या तक्रारीवरुन दूध संघाचे संचालक मंडळ उप सचिवांच्या आदेशाने बरखास्त करण्यात आले होते. तसेच दूध संघावर 11 जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले होते.

दरम्यानच्या काळात दूध संघाचे संचालक जगदिश बढे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवून धोरणात्मक निर्णय न घेण्याचे आदेश दिले होते. हे आदेश येताच जुने संचालक मंडळ आज दुपारी दूध संघात अवतरले.

चेअरमन मंदाताईंनी घेतली बैठक

न्यायालयाने आदेश दिल्यानंतर चेअरमन मंदाताई खडसे यांनी मंगळवारी दुपारी संचालक मंडळाची बैठक घेतली. या बैठकीला ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. वसंतराव मोरे, डॉ.संजीव पाटील, प्रमोद पाटील, अशोक पाटील, श्यामल झांबरे, सुनिता पाटील, हेमराज चौधरी, जगदिश बढे आदी उपस्थित होते. या बैठकीत दूध उत्पादकांचे दूध संकलनाचे तब्बल सहा कोटी रुपयांचे धनादेश अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संचालक मंडळाने दिली.

बैठकीची कुणकुण अन् प्रशासक मंडळ पोहचले दूध संघात

मंदाताई खडसे या बैठक घेत असल्याची कुणकुण लागताच प्रशासक मंडळातील सदस्य अजय भोळे, अरविंद देशमुख, विकास पाटील आणि अ‍ॅड. धनंजय ठोके हे दूध संघात दाखल झाले. त्यांनी तातडीने दूध संघाचे मुख्य प्रशासक आमदार मंगेश चव्हाण यांना मंदाताई खडसे या बैठक घेत असल्याचा निरोप दिला.

हा निरोप मिळताच आ.मंगेश चव्हाण हे देखील दुपारी 4 वाजेच्या सुमारास दूध संघात दाखल झाले. यावेळी मंदाताई खडसे यांच्यासह त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या संचालक मंडळाने दूध संघातून काढता पाय घेतला.

प्रशासकीय मंडळच कामकाज पाहणार

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांचे प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले आहे. प्रशासकीय मंडळातील सदस्य अशोक कांडेलकर, अरविंद देशमुख, अमोल शिंदे आणि अमोल पाटील यांनी दि. 27 रोजी पदभार घेवून तसा रोजनामा केला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्टेटस्कोचे आदेश झाले असून, धोरणात्मक निर्णय घेवू नये असे सूचित करण्यात आले आहे. दूध संघाचे कार्यकारी संचालक हे प्रशासकीय प्रमुख असून संस्थेचे दप्तर व इतर मालमत्ता आपल्या ताब्यात असल्यामुळे कलम 77 (अ) नुसार प्रशासकीय मंडळाला दिलेला ताबा वैध असल्याचे पत्र नाशिक विभाग सहकारी संस्थांचे विभागीय उपनिबंधक सुरेंद्र तांबे यांनी दूध संघाचे कार्यकारी संचालक यांना दिले आहे. तसेच संस्थेचा पदभार प्रशासकीय समितीने घेतलेला असल्यामुळे दैनंदिन कामकाज प्रशासकीय समितीशी सल्लामसलत करुन व्हावे. असेही पत्रात नमुद करण्यात आले आहे.

दूध संघाची चेअरमन मीच : मंदाताई खडसे

न्यायालयाने जैसे थे चे आदेश दिले आहे. त्या आदेशानुसार दूध संघाची चेअरमन मीच असल्याचा दावा मंदाताई खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. तसेच प्रशासक मंडळाने रात्रीच्या सुमारास घेतलेला ताबा हा अवैघ आहे. त्यांनी पदभार घेतांना चेअरमनकडूनच पदभार घेणे अपेक्षित होते. चांगल्या संस्थेत राजकारण करण्याचा हा प्रकार सुरु आहे. गेल्या सात वर्षात दूध संचालक मंडळाने दूध उत्पादक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहे. चांगल्या संस्थेवर अनेकांचा डोळा आहे.

दूध संघाला प्रत्येक वर्षी नफा झाला असून, लेखा परीक्षणात साधा आक्षेपदेखील नसल्याचे सांगुन गैर व्यवहाराचा आरोप मंदाताई खडसे यांनी फेटाळला आहे. दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नियुक्तीचे कुठलेही आदेश दूध संघ प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

समाज माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही न्यायालयात धाव घेतली होती. दूध संघाच्या पदभार प्रकरणासंदर्भात दि. 19 रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे दि. 19 पर्यंत मीच चेअरमन असल्याचा पुर्नरुच्चार मंदाताई खडसे यांनी केला.

आमचे प्रशासक मंडळच वैध : आ.चव्हाण

शासनाच्या आदेशानुसार जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ दि. 27 रोजी बरखास्त करण्यात आले आहे. या सोबतच शासनाने 11 जणांचे प्रशासकीय मंडळ त्यावर नियुक्त केले असून, त्यावर मुख्य प्रशासक म्हणून त्यावर माझी निवड झाली आहे. त्यामुळे आमचे प्रशासकीय मंडळच वैध असल्याचा दावा मुख्य प्रशासक तथा भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

दूध संघात पोलिसांचा बंदोबस्त

जिल्हा दूध संघात जुने संचालक मंडळ आणि प्रशासकीय मंडळ असे दोन्ही गट दाखल झाले होते. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दूध संघाने पोलिसांना पाचारण केले होते. यावेळी दूध संघात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

एम.डी.लिमये रजेवर

गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा दूध संघात ताबा नाट्य रंगत आहे. आपल्या उपस्थितीत कुठलाही प्रकार घडू नये या भीतीपोटी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये हे रजेवर निघून गेले आहेत. त्यांचा पदभार ज्यांच्याकडे आहे सी.एम.पाटील ते देखील दुपारी कार्यालयात हजर नव्हते.

- Advertisment -

ताज्या बातम्या