Thursday, April 25, 2024
Homeनगरतलवार, गज, कत्तीने तिघांवर जीवघेणा हल्ला

तलवार, गज, कत्तीने तिघांवर जीवघेणा हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतातील पिकामध्ये गेलेली जनावरे हाकलल्याचा राग धरून तिघांवर तलवार, लोखंडी गज, कत्तीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी दुपारी पिंपळगाव कौंडा (ता. नगर) येथे घडली. या हल्ल्यात ज्ञानदेव कुंडलिक बनकर, बाजीराव मारूती बनकर, अभिषेक बाजीराव बनकर (सर्व रा. पिंपळगाव कौंडा) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

जखमी ज्ञानदेव बनकर यांनी नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून रमेश सावत्या भोसले, तुषार सावत्या भोसले, अविनाश सावत्या भोसले (सर्व रा. पिंपळगाव कौंडा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी ज्ञानदेव, बाजीराव व अभिषेक त्यांच्या शेताच्या बांधावर असताना शेळ्या व जनावरे शेतातील तुरीचे व मुगाचे पीक खात असल्याने अभिषेकने शेळ्या व जनावरे शेताच्या बाहेर हाकलून दिले. रमेश भोसले याला त्याचा राग आल्याने त्याने तुषार व अविनाश यांना सांगितले. त्यांनी तिघांनी हातात तलवार, लोखंडी गज, कत्ती घेऊन अभिषेक, ज्ञानदेव व बाजीराव यांना मारण्याचा उद्देशाने त्यांच्याकडे आले.

तुम्ही आमची शेळ्या व जनावरे हाकलता, काय आमची दहशत कमी झाली काय, असे म्हणत अभिषेक, ज्ञानदेव व बाजीराव यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार, गज व कत्तीने हल्ला करून जखमी केले असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास उपनिरीक्षक मारग करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या