Saturday, April 27, 2024
Homeनगरराज्यात स्वाध्याय उपक्रमात सोलापूर पहिले उत्तर महाराष्ट्रात जळगाव प्रथम

राज्यात स्वाध्याय उपक्रमात सोलापूर पहिले उत्तर महाराष्ट्रात जळगाव प्रथम

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी दर शनिवारी स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यातून सुमारे 76 लाख विद्यार्थ्यांनी याकरिता नोंदणी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.

करोनामुळे शाळा बंद आहे. मात्र विविध मार्गाने विद्यार्थ्यांची शिकणे सुरू आहे. शिकणे कोणत्या स्वरूपाचे सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी परिषदेच्या वतीने स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यातून यास उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून तेथील पाच लाख 55 हजार 536 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहेत. सातारा जिल्हा द्वितीय क्रमांकावर असून तीन लाख 89 हजार 166 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग दिला आहे. राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील तीन लाख 39 हजार 312 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

उत्तर महाराष्ट्रात जळगाव पहिले- उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांपैकी जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर असून तेथील दोन लाख 14 हजार 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एक लाख 44 हजार 896 विद्यार्थ्यांनी स्वाध्याय पूर्ण केले आहेत. धुळे जिल्ह्यातील 56 हजार 83 विद्यार्थ्यांनी, नाशिक जिल्ह्यातील 63 हजार 954 विद्यार्थ्यांनी तर नंदुरबार जिल्ह्यातील 19 हजार 329 विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रमात सहभाग नोंदविला आहेत. उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा दुसर्‍या स्थानी आहे.

प्रत्येक विभागात हा जिल्हा पहिला- राज्याच्या शैक्षणिक विभागानुसार अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा पहिल्या क्रमांकावरती आहे. औरंगाबाद विभागामध्ये जालना जिल्हा प्रथम क्रमांकावर असून तेथील एक लाख 83 हजार 647 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. कोकण विभागात ठाणे जिल्हा प्रथम क्रमांकावर असून तेथील एक लाख 46 हजार 465 विद्यार्थ्यांनी सहभाग दिला आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख 56 हजार 536 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक राखला आहे. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्याचा प्रथम क्रमांक तर नागपूर विभागांमध्ये चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर ती असून तेथील 1654 विद्यार्थ्यांनी प्रतिसाद नोंदविला आहे.

मुंबई सर्वात कमी

राज्यात 36 जिल्ह्यांपैकी मुंबई विभागातून सर्वात कमी प्रतिसाद लाभला आहे. नऊ लाख 54 हजार 359 विद्यार्थ्यांपैकी अवघ्या दोन हजार 551 विद्यार्थ्यांनी प्रतिसाद नोंदविला आहे. प्रमाण देखील अवघे 1.58 टक्के, पालघर 1.80 टक्के, गडचिरोली 3.30 टक्के, नागपूर 3.6 टक्के, बीड 4.5% असे प्रमाण राखण्यात आले आहेत. सातारा 91.04, बुलढाणा 71.21 सोलापूर 65.20, उस्मानाबाद 59.28, वाशिम 55.84 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

80 टक्के विद्यार्थी स्वाध्यायापासून दूर

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने दर शनिवारी विद्यार्थ्यांना स्वाध्याय लिंक उपलब्ध करून देण्यात येते. इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी हे स्वाध्याय सोडवत आहेत. मूलभूत स्वरूपाचे प्रश्न यासाठी देण्यात येत असून त्याआधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ही होत आहे. विद्यार्थ्यांना आपली प्रगती समजण्यास मदत होणार आहे. राज्यात एक कोटी 93 लाख 98 हजार 548 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 38 लाख 72 हजार 976 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर 37 लाख 63 हजार एकशे पाच विद्यार्थ्यांनी प्रश्नावली पूर्ण सोडविली आहे. हे शेकडा प्रमाण सुमारे 20 टक्के आहे. अद्यापही 80 टक्के विद्यार्थी या प्रक्रियेपासून दूर असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या