Friday, April 26, 2024
Homeनगरशेतकर्‍यांना धुळीस मिळविण्याचा राज्य व केंद्राचा प्रयत्न - राजू शेट्टी

शेतकर्‍यांना धुळीस मिळविण्याचा राज्य व केंद्राचा प्रयत्न – राजू शेट्टी

टाकळीमिया/राहुरी |तालुका प्रतिनिधी| Takalimiya

केंद्र व राज्य सरकार उसाच्या एफआरपीचे तुकडे पाडून शेतकर्‍याला धुळीस मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्व शेतकर्‍यांनी पक्ष, गटतट विसरून संघटित होऊन या लढ्यासाठी प्रत्येक घरातून एका युवकाची ताकद आम्हाला द्या, देशातील शेतकर्‍यांना सोन्याचे दिवस दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे ‘जागर एफआरपीचा आराधना शक्तिपीठांची’ या कार्यक्रमांतर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड. रावसाहेब करपे होते. व्यासपीठावर स्वाभिमानीचे रवीकांत तुपकर, रणजित बागल, संदीप जगताप, सुरेश टाके, सुभाष पठारे, जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे उपस्थित होते.

श्री. शेट्टी म्हणाले, सन 1966 च्या कायद्यानुसार 14 दिवसांत शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक असताना वीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम थकीत आहे. यासाठी न्यायालयात न्याय मागितला, त्यानंतर केंद्र व राज्याने मिळून एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. राज्याने यास मान्यता दिली आहे. आज भाजपा केंद्रात तर राज्यात महाविकास आघाडी दोघेही शेतकर्‍यांच्या बाजूने नाही. आपली लढाई आपल्यालाच संघटित होऊन लढावी लागेल. नगर जिल्ह्यात तर शेतकर्‍यांची लूट होत आहे. कोल्हापूरकडे तीन हजार रुपये एफआरपी मिळते आणि नगर जिल्ह्यात 2100 ते 2200 रुपये जेमतेम मिळतात. हा केवळ रिकव्हरी चोरण्याचा नवीन उद्योग या जिल्ह्यात सुरू आहे. एकरकमी एफआरपी मिळायला लागल्यापासून शेतकरी कर्जबाजारी कमी होऊन आर्थिक सुबत्तेकडे जात असताना कारखानदारांना देखवत नाही. यासाठी संघटीत व्हा व रवी मोरे यांच्या आंदोलनाला जिल्ह्यातून पाठबळ द्या, असे आवाहन त्यांनी केले.

दसर्‍यानंतर जयसिंगपूर येथे आंदोलनाची पुढील वाटचाल ठरणार आहे, अशी माहिती श्री. शेट्टी यांनी दिली. सर्व शेतकर्‍यांना शपथ देऊन न्यायालयात शेतकर्‍यांची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी 8448183751 या नंबरवर मिसकॉल देऊन आंदोलनात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी चळवळीला बळ देणारा नगर जिल्हा, राहुरी तालुका शेतकरी आंदोलनात कमी पडतो. आता दरबारी राजकारण मोडून काढून स्वातंत्र्यासाठी लुटणार्‍यांचा नरडीचा घोट घ्यावा लागेल, यासाठी स्वतःच्या हितासाठी प्रत्येक आंदोलनाला ताकद द्या, असे आवाहन करून रवी मोरे यांना ताकद द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रणजित बागल, संदीप जगताप, रवी मोरे आदींनी विचार व्यक्त केले.

मेळाव्यासाठी कारखान्याचे माजी संचालक अ‍ॅड. पंढरीनाथ पवार, ताराचंद तनपुरे, विजय बानकर, केशवराव शिंदे, दिलीप इंगळे, शिवाजी डौले, शिवशंकर करपे, अनिल इंगळे, ज्ञानदेव निमसे, कारभारी फाटक, सुभाष जुंद्रे, आरपीआयचे बाळासाहेब जाधव, पप्पू धुमाळ, गुलाब निमसे, अमोल तनपुरे, प्रभाकर धुमाळ, डॉ. संजय कुलकर्णी, सतीश करपे, अ‍ॅड. तोडमल, अ‍ॅड. देशमुख, डॉ. शेटे, वैभव शेटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी राहुरी तालुका वकील संघटना यांच्या वतीने संघटनेच्या सर्व आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करून त्याप्रमाणे खासदार शेट्टी यांच्याकडे पत्र देण्यात आले. जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकार्‍यांची नियुक्ती पत्रे यावेळी खासदार शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक रवींद्र मोरे यांनी तर आभार प्रकाश देठे यांनी मानले.

उसाच्या एफआरपीसंदर्भात चर्चा चालू असतानाच राहुरी तालुका ऊस वाहतूकदार संघटनेने वाहतूक दरवाढ करण्याबाबत शेट्टी यांना निवेदन दिले. आमच्याही मागण्या सरकार दरबारी मांडण्याचे साकडे घातले. साखर कारखान्यांना शेतकर्‍यांचा ऊस वाहतूक करणारी यंत्रणा ही मोठी बाजू आहे. आज डिझेलची मोठी दरवाढ झालेली असतानाच संबंधित साखर कारखानदार वाहतूक दरात वाढ करून देत नाही. याबाबत साखर आयुक्तांकडे मागणी करण्यात आली. मात्र, त्यांनी साखर कारखान्याकडे बोट दाखविले. याबाबत साखर आयुक्तांकडे कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे आता तुम्हीच न्याय मिळवून द्या, अशी मागणी शेट्टी यांच्याकडे करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या