Friday, April 26, 2024
Homeनगरआ. डॉ. तांबे यांचा सातत्याने लोकसंपर्क व कामांचा पाठपुरावा कौतुकास्पद - सुशीलकुमार...

आ. डॉ. तांबे यांचा सातत्याने लोकसंपर्क व कामांचा पाठपुरावा कौतुकास्पद – सुशीलकुमार शिंदे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा सांभाळताना नामदार बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत सातत्याने ठेवलेला जनसंपर्क व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेला पाठपुरावा हा अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले असून थोरात व तांबे परिवाराने खर्‍या अर्थाने यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी केले आहे.

- Advertisement -

पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात यशवंत वेणू प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने राज्यस्तरीय यशवंत वेणू पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, माजी आमदार उल्हासदादा पवार, कवी रामदास फुटाणे, उद्धव कानडे, कार्याध्यक्ष रंगनाथ गोडगे, सचिन इटकर, नारायण सुर्वे साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुदाम मोरे, सुनील उकिर्डे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना शानदार कार्यक्रमात मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन यशवंत वेणू या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले, सध्या देशात अस्थिर परिस्थिती आहे. मात्र या सर्वांमध्ये काँग्रेसचा शाश्वत विचार देशाला तारणारा आहे. भाऊसाहेब थोरात यांच्या तत्त्वांवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात सहकारातून मोठे काम उभे केले आहे. हाच आदर्श घेवुन आमदार डॉ. तांबे आणि उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात 54 तालुक्यात ठेवलेला जनतेशी सातत्याने संपर्क, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी केलेला पाठपुरावा, सभागृहात पदवीधर, बेरोजगार, शिक्षक यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने केलेली अभ्यासपूर्ण मांडणी. याचबरोबर त्यांचा नम्र स्वभाव हा सर्वांना भावणारा आहे. तर सौ. दुर्गाताई तांबे यांनी संगमनेर शहराची स्वच्छता व शहर राबवलेल्या विविध उपक्रम मधून नवी ओळख निर्माण करून दिली आहे. यशवंतराव वेणू ताईंचा वारसा चालवणारा या दाम्पत्याने समाज उभारणीत जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून मोठे योगदान दिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सत्काराला उत्तर देताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा आपल्याला प्रेरणा देणारा आहे. महाराष्ट्रातील या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आपण राजकारण व समाजकारणात काम करत आहोत. या नावाने पुरस्कार मिळणे हा जीवनातील आनंदाचा क्षण असल्याचे ते म्हणाले तर सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संगमनेर मध्ये काम करताना काही ज्येष्ठ लोक यशवंत वेणू म्हणून हाक मारायचे आज त्याच नावाने पुरस्कार मिळतो आहे याचा मोठा आनंद आहे हा पुरस्कार खर्‍या अर्थाने संगमनेर आणि उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, कविवर्य रामदास फुटाणे यांचीही भाषणे झाली.

प्रास्ताविक अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले तर कार्याध्यक्ष रंगनाथ गोडगे, सचिन ईटकर यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या