Saturday, April 27, 2024
Homeनगरआणखी 54 हजार करोना लशींचा पुरवठा

आणखी 54 हजार करोना लशींचा पुरवठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

45 वर्षांवरील सर्वांनाच करोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर आता नगर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे.

- Advertisement -

आधी 107 केंद्रांवर लस दिली जात होती. 1 एप्रिलपासून त्यात वाढ करून आता लसीकरण केंद्रांची संख्या 165 करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. काही केंद्रांवर लशीचा तुटवडा होता. त्यानंतर 31 मार्च रोजी 54 हजार 700 डोस जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून ते तात्काळ संबंधित केंद्राला पोहोच करण्यात आले आहेत.

नगर जिल्ह्यासह देशभरात 16 जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ आरोग्य कर्मचारी, तसेच फ्रन्टलाइन वर्कर यांनाच लस दिली जात होती. त्यावेळी जिल्ह्यात केवळ 15 ते 20 लसीकरण केंद्र होते. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिक, तसेच व्याधिग्रस्त 45 वर्षांवरील नागरिक यांना लस देण्याचा निर्णय झाला.

त्यानंतर जिल्ह्यात कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून ती 107 करण्यात आली. परंतु शासनाने पुन्हा 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याच्या सूचना दिल्याने नगर जिल्ह्यात केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे.

सध्या जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका तसेच खासगी 33 रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र आहेत. त्यातून आतापर्यंत 2 लाख 1 हजार 588 लोकांना लस दिली आहे. त्यामध्ये दीड लाख डोस ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील लोकांना दिले आहेत.

असे आहेत लसीकरण केंद्र

जिल्हा रुग्णालय 1, उपजिल्हा रुग्णालय 2, ग्रामीण रुग्णालय 23, प्राथमिक आरोग्य केंद्र 96 महापालिका 9, कॅन्टोन्मेंट 1, खासगी दवाखाने 33 असे एकूण 165 केंद्र

- Advertisment -

ताज्या बातम्या